मालिकेत बरोबरी करायची भारतीय संघाला मोठी संधी

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात उद्यापासून दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या शिखर धवन ऐवजी के एल राहुल आणि रोहित शर्मा ऐवजी अजिंक्य रहाणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात संघाबाहेर बसलेले इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनाही ११ जणांच्या संघात संधी मिळते का हे पाहावे लागेल.

भारतीय संघाने केपटाऊन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव स्वीकारला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी पहायला मिळाली होती. परंतु फलंदाजांनी सुमार कामगिरी केली होती. या सामन्यात भारताकडून फक्त हार्दिक पंड्या या एकमेव खेळाडूने अर्धशतक केले होते.

३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला या मालिकेत पराभव टाळण्यासाठी उद्यापासून सुरु होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल अथवा सामना अनिर्णित राखावा लागेल.

आत्तापर्यंत सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन या स्टेडिअमवर भारताने एकच कसोटी सामना खेळला आहे. यातही भारताला एक डाव आणि २५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्टेडिअमवर भारताकडून फक्त सचिन तेंडुलकरने शतक केले आहे तर एम एस धोनी, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागने अर्धशतके केली आहेत. परंतु यातील एकही जण सध्याच्या भारतीय कसोटी संघात खेळत नाही.

सध्याच्या भारतीय कसोटी संघातील फक्त इशांत शर्मा या स्टेडिअमवर खेळला आहे. त्याने येथे खेळताना २ बळी घेतले आहेत.