दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

पोर्ट एलिझाबेथ। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज पाचवा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

६ सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारतीय संघ ३-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तसेच भारतीय संघ आजपर्यंत पोर्ट एलिझाबेथ येथे विजयी झालेला नाही त्यामुळे ते हा इतिहास बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पण त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले आहे, त्यामुळे तेसुद्धा भारताला कडवी झुंज देतील.

मागील सामन्याप्रमाणेच या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. चौथ्या सामन्यात पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव २८ षटकांचाच करण्यात आला होता आणि त्यांनी हा सामना ५ विकेट्सने जिंकला होता.

आज होणाऱ्या सामन्यासाठी ११ जणांच्या भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. तर दक्षिण आफ्रिका संघात इम्रान ताहिरचे पुनरागमन झालेले आहे. तसेच ताब्राईझ शम्सीलाही ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.

असे आहेत संघ:
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर.

दक्षिण आफ्रिका संघ: एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल,अँडिल फेहलूकवयो, कागिसो रबाडा,ताब्राईझ शम्सी, इम्रान ताहीर.