भारतीय महिलांनी सामना गमावला; पण मालिका जिंकली

दक्षिण आफ्रिका महिला संघाने आज तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघावर विजय मिळवून प्रतिष्ठा वाचवली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून मिग्नॉन द्यू प्रीझने नाबाद अर्धशतकी खेळी केली.

भारतीय संघाने हा सामना गमावला जरी असला तरी पहिले दोन्ही सामने जिंकले असल्याने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवून इतिहास रचला आहे. या मालिकेची मालिकावीर म्हणून स्म्रिती मानधनाची निवड झाली. तिने पहिल्या वनडेत अर्धशतकी आणि दुसऱ्या वनडेत शतकी खेळी केली होती.

भारताने आज दक्षिण आफ्रिकेला २४१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणारी सलामीवीर फलंदाज लिझेल लीची विकेट लवकर गमावली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना सहज यश मिळू दिले नाही.

ली बाद झाल्यानंतर अँड्री स्टेनने लॉरा वोलवार्डला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तीला पूनम यादवने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. नंतर वोलवार्ड आणि मिग्नॉन द्यू प्रीझने ११८ धावांची शतकी भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या समीप नेले.

वोलवार्डने ४ चौकारांच्या साहाय्याने ८८ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने मिग्नॉन द्यू प्रीझची चांगली साथ दिली. या दोघींनीही नाबाद राहून डावाच्या ४९.२ षटकात ३ बाद २४१ धावा करून दक्षिण आफ्रिकेचा विजय साकार केला. मिग्नॉन द्यू प्रीझने १११ चेंडूत नाबाद ९० धावांची खेळी केली. यात तिने ७ चौकार मारले. तसेच कर्णधार निएकर्कने ३० चेंडूत ५ चौकारांच्या साहाय्याने आक्रमक ४१ धावांची खेळी केली.

भारताकडून शिखा पांडे(१/४३), एकता बिश्त(१/३८) आणि पूनम यादव(१/५२) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारताने ५० षटकात सर्वबाद २४० धावा केल्या होत्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्थीने अर्धशतके केली. दीप्तीने ११२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. वेदाने ६४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. तसेच आज मागील दोन सामन्यात एक अर्धशतक आणि एक शतक करणारी स्म्रिती मानधना आज शून्य धावेवरच बाद झाली.

बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. त्यांच्यापैकी मिताली राज(४), मोना मेश्राम(११),सुषमा वर्मा(१७),पूजा वस्त्रकार(१), शिखा पांडे(३१*), एकता बिश्त(१) आणि पूनम यादव(२) यांनी धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल(४/३०), क्लो ट्रायऑन(२/४८),रायसिब टोझखे(१/३९),डेन व्हॅन निएकर्क(१/२८) आणि आयबॉन्ग खाका(१/४७) यांनी विकेट्स घेतल्या.