दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिकेने गुलाबी सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी कायम ठेवली आहे. त्यांनी आज भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेतील भारताची ३-१ ने आघाडी कमी केली आहे.

यासामन्यात भारताने आधी दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ५० षटकात २९० धावांचे आव्हान दिले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु झाली आणि काही षटकांनंतर पाऊस चालू झाला. त्यामुळे सामना काही वेळ थांबला होता. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला पण दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार २८ षटकात २०२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या, पण प्रत्येक फलंदाजाने आपले योगदान दिल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी विजय सोपा झाला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने २७ चेंडूत नाबाद ४३ धावांची आक्रमक खेळी केली. हीच दक्षिण आफ्रिकेच्या डावातील वयक्तिक सर्वाधिक खेळी ठरली. डेव्हिड मिलरनेही त्याची साथ देताना २८ चेंडूत ३९ धावांची स्फोटक खेळी केली. तर डावाच्या २६ व्या षटकात अँडिल फेहलूकवयोने बॅटने प्रहार करत ५ चेंडूत नाबाद २३ धावा करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अन्य फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार एडिन मार्करम(२२), हाशिम आमला(३३), जेपी ड्युमिनी(१०) आणि एबी डिव्हिलियर्स(२६) यांनी धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव (२/५१), युझवेन्द्र चहल(१/६८), हार्दिक पंड्या(१/३७) आणि जसप्रीत बुमराह(१/२१) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी, भारताने ५० षटकात ७ बाद २८९ धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने १०५ चेंडूत १०९ धावा करत शतकी खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक केले. कोहलीने ८३ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या.

शिखर आज त्याचा १०० वा वनडे सामना खेळला आणि त्याने शतक करून विक्रमही केला. १०० व्या वनडेत शतक करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील एकूण नववा फलंदाज ठरला आहे.शिखरचे हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील १३ वे शतक आहे.

हे दोघे बाद झाल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने आक्रमक खेळ केला, पण त्याला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. धोनीने ४३ चेंडूत ४२ धावा केल्या. यात त्याने १ षटकार आणि ३ चौकार मारले.

बाकी फलंदाजांपैकी अजिंक्य रहाणे(८), श्रेयश अय्यर(१८), हार्दिक पंड्या(९) आणि भुवनेश्वर कुमार(५) यांनी धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा (२/५८), लुंगीसानी एन्गिडी(२/५२), ख्रिस मॉरिस (१/६०) आणि मोर्ने मॉर्केल(१/५५) यांनी विकेट्स घेतल्या.