दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सर्वात घातक – रोहित शर्मा

भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने क्रिकबझला एक मुलाखत दिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सर्वात घातक आहे.

रोहितला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविषयी विचारले असता तो म्हणाला, ” त्यांचे आक्रमण सर्वोत्कृष्ट आहे. तस म्हणायचं तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडेही त्यांच्या देशात खेळताना गोलंदाजीत चांगली विविधता आहे. पण दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी आक्रमण हे वेगळे आणि घातक आहे. त्यांचे आक्रमण हे एक आयामी नाही. त्यांच्याकडे विविधता आहे, अनुभव आहे आणि वेगळ्या पातळीचे कौशल्य आहे.”

रोहितने कागिसो रबाडा आणि मॉर्ने मॉर्केलला त्यांच्या उंचीचा फायदा होईल असे म्हटले आहे. तसेच तो डेल स्टेन विषयी म्हणाला, ” स्टेनला नवीन आणि जुना चेंडू कसा हाताळायचा याचा अनुभव आहे. व्हर्नोन फिलँडर हा दक्षिण आफ्रिकेत खेळताना धोकादायक आहे. तो चेंडूची लेन्थ अशी ठेवतो की ज्यामुळे काही करणे अवघड असते. या एका वर्षात आम्ही ज्या गोलंदाजी आक्रमणांना सामोरे जाणार आहोत त्यात हे सर्वात आव्हानात्मक आक्रमण असणार आहे.”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पोहोचला आहे. ५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.