स्पेनने रोखला इटलीचा विजयी रथ !

माद्रिद :स्पेन आणि इटली या संघात झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात स्पेनने इटलीचा ३-० असा पराभव केला. स्पेनकडून इस्कोने दोन गोल झळकावले तर बदली खेळाडू म्हणूनआलेल्या आल्वोरो मोराटाने शेवटचा गोल केला.

या सामन्यात पहिल्या सत्रापासूनच स्पेनच्या खेळाडूंचा दबदबा राहिला.या सामन्यात पहिला गोल स्पेनच्या इस्कोने केला. त्याने बॉक्स बाहेर मिळालेल्या फ्री किकवर उजव्या पायाने गोल केला. इटलीचा महान गोलकिपर बुफॉन हा फटका अडवू शकला नाही. सामन्यातील आणि स्पेनचा दुसरा गोल देखील इस्कोने केला. हा गोल करताना इस्कोने उत्तम पडदालित्य दाखवले आणि डाव्या पायाने हा सुरेख गोल नोंदवला.

सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने अनुभवी मिडफिल्डर इनिएस्टा याला विश्रान्ती दिली. त्याच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून चेल्सीचा स्ट्रायकर आल्वोरो मोराटा सामन्यात आला. त्याने आक्रमणे चालू केली. स्पेनचचा कर्णधार रामोस बरोबर चाल रचत त्याने या सामन्यातील तिसरा तर स्वतःचा पहिला गोल करत सामना संपवला.

२००६ पासून इटलीने पात्रता फेरीचा एकही सामना गमावला नव्हता. त्यांचा हा विजयी रथ स्पेनने रोखला. या सामन्यातील विजयसह स्पेनने पाच गुणांची कमाई केली. स्पेन विश्वचषक पात्रता फेरीच्या ‘ग्रुप जी’ ‘मध्ये १९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. स्पेनने खेळलेल्या ७ सामन्यात ६ विजय मिळवले आहेत तर एक सामना त्यांनी बरोबरीत सोडवला आहे. दुसर्या क्रमांकावर इटली असून ते तीन गुणांनी पिछाडीवर आहेत.

पात्रता फेरीच्या प्रत्येक गटातून फक्त पहिला संघ २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे. बाकीचे ७ संघ हे या स्पर्धेसाठी अपात्र ठरतील.