एशियन गेम्ससाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील कबड्डीपटूंच्या खास प्रतिक्रिया

इंडोनेशियामधील जकार्ता येथे होणाऱ्या 18 व्या एशियन गेम्ससाठी  भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची 7 जुलैला घोषणा करण्यात आली.

यात 12 खेळाडूंच्या पुरुषांच्या संघात गिरीश इरनाक आणि रिशांक देवाडिगा या महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना तर 12 खेळाडूंच्या महिलांच्या संघात सायली केरीपाळे या महाराष्ट्राच्या एकमेव खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर रेल्वेकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेलाही भारतीय महिलांच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

गिरीश आणि रिशांक हे दोघेही नुकत्याच पार पडलेल्या दुबई मास्टर्स स्पर्धेत भारताकडून प्रत्येकी ५ सामन्यात खेळले आहेत. या स्पर्धेत या दोघांचीही जबरदस्त कामगिरी राहिली आहे.

तसेच महिलांच्या संघात निवड झालेल्या सायली आणि सायली या दोघींचीही पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे आणि तेही थेट एशियन्स गेम्ससाठी. या दोघींनाही या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे.

त्यामुळे आता एशियन गेम्समध्येही महाराष्ट्राच्या या खेळाडूंकडून अशाच चांगल्या खेळाची अपेक्षा सर्वांना असणार आहे.

एशियन गेम्ससाठी भारतीय संघात निवड झालेल्या या खेळाडूंनी महास्पोर्ट्सला खास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रिशांक देवाडीगा: “माझे हे स्वप्न होते, जे सत्यात उतरले आहे. जेव्हापासुन कबड्डीला सुरुवात केली तेव्हापासुन चांगले खेळण्याचा प्रयत्न होता. मला भारतासाठी चांगली कामगिरी करायची आहे. ”

“माझ्यासाठी 2018चा मोसम चांगला होता. प्रो-कबड्डी, तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी झाली. महाराष्ट्राच्या संघाने नॅशनल चॅम्पियन्सशिपही मिळवली. तसेच दुबई मास्टर्स स्पर्धेतही सुवर्णपदक मिळाले.”

याबरोबरच रिशांकला दुबई मास्टर्स स्पर्धेविषयी विचारले असता तो म्हणाला, “माझी निवड झाली तेव्हा आनंद झाला. कॅम्पमध्येही खूप मेहनत घेतली होती. मी संधीची वाट पाहत होतो. पहिल्या सामन्यात मला संधी मिळाली नाही पण दुसऱ्या सामन्यानंतर मला संधी मिळाली. माझा खेळही चांगला झाला.”

सायली केरीपाळे: माझी निवड झाली तेव्हा भरपूर आनंद झाला. माझ्याबरोबरच घरातलेदेखील खूप खुश आहेत. मी या संधीची खूप वाट पाहत होते.

आता या स्पर्धेसाठी तयारी चालू आहे. कॅम्पमध्ये चांगली तयारी केली होती. तसेच आता स्पर्धेसाठी कॅम्प लागेल. तेव्हा प्रशिक्षक आमची आणखी तयारी करुन घेतील.

सोनाली शिंगटे: भारताच्या संघात निवड झाल्यामुळे खूप आनंद झाला. भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळावे हे माझे स्वप्न होते.

माझ्यावर दाखवलेला विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे. तसेच भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे. भारताने या आधीही सुवर्णपदके मिळवले आहे. पण हे सुवर्णपदक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

एशियन्स गेम्ससाठी असा आहे भारतीय संघ:

पुरुषांचा संघ- गिरीष इरनक, दिपक हुडा, मोहित चिल्लर, संदीप नरवाल, परदिप नरवाल, रिशांक देवडिगा, मोनु गोयत, अजय ठाकूर, रोहित कुमार, राजूलाल चौधरी, मल्लेश गंधारी, राजू चौधरी. स्टॅड बाय- अमीत नागर, मनिंदर सिंग

महिलांचा संघ- साक्षी कुमारी, कविता, प्रियांका, मनप्रीत कौर, पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे, सायली केरीपाळे, रनदिप कौर खेरा, शालिनी पाठक, उषा नरसिंग, मधू. स्टॅड बाय-  प्रियांका, शमा परविन

महत्त्वाच्या बातम्या:

-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक

-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा