युएफा चॅम्पियनशीप: बार्सेलोना संघाने केला स्पोर्टींग लिसबोन संघाचा पराभव!!

युएफा चॅम्पियनशीपच्या सामन्यात बार्सेलोना संघाने पोर्तुगीज संघ स्पोर्टींग लिसबोन या संघाचा १-० असा निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल बार्सेलोनाच्या लुईस सुआरेज याने केला. बार्सेलोनाचा संघाचा गोलकीपर मार्क टेर स्टेगन याने या सामन्यात उत्तम बचाव केला.

सामन्याच्या पहिल्या सत्रात बार्सेलोना संघाच्या आक्रमणाला रोखण्याच्या हेतूने लिसबोन संघाने उत्तम बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला. बार्सेलोना संघाला १६ व्या मिनिटाला गोल करण्याची उत्तम संधी जोर्डी अलाबाने निर्माण केली. परंतु अलाबाने इन केलेला बॉल गोल जाळ्यात ढकलण्यात सुआरेज अपयशी ठरला. २०व्या मिनिटाला पुन्हा जोर्डी अलाबाने पुन्हा संधी निर्माण केली. यावेळी त्याने केलेला बॉल इन सुआरेजने लियोनल मेस्सीसाठी सोडला. परंतु मेस्सीने मारलेला फटका सरळ लिसबोनचा गोलकीपर रुई पॅट्रिसिओ याच्या हातात जाऊन विसावला. पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बार्सेलोना संघाला फ्री किक मिळाली. ती फ्री किक मेस्सीने गोलकडे मारली. त्यावर सुवारेजने हेडर करण्याचा प्रयन्त केला परंतु त्याला दिशा आणि ताकद देऊ शकला नाही. त्याचा हेडर जाऊन लिसबोन संघाच्या डिफेंडरला लागला आणि बॉल गोल जाळ्यात गेला. याचबरोबर बार्सेलोना संघाने १-० अशी आघाडी घेतली. यानंतर लिसबोन संघाने अनेक आक्रमक चाली रचल्या परंतु त्यांना थोपवण्याचा काम बार्सेलोना संघाच्या डिफेंडर आणि गोलकीपर स्टेगन याने चोख बजावले.

बार्सेलोना आणि लिसबोन या संघातील हा सामना बार्सेलोना संघाने १-० असा जिंकला. या सामन्यात मेस्सीला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे त्याच्या युएफा चॅम्पियनशीपच्या १००व्या गोलची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. युएफा चॅम्पियनशीपमध्ये मेस्सीच्या नावावर एकूण ९७ गोल आहेत.