ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत अनंतात विलीन

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा संघटक आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे अर्ध्वयू प्रल्हाद सावंत यांचे (वय ६९) गुरुवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी क्रीडा, पत्रकारीता, राजकारण, समाजकारण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

क्रीडा पत्रकारिता, क्रीडा स्पर्धा संयोजन आणि संघटनाद्वारे त्यांनी क्रीडाक्षेत्रात ठसा उमटविला होता. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनात त्यांचे मोठे योगदान होते.

हैदराबादमधील आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा, चेन्नईतील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रॉसकंट्री, पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह विविध शेकडो क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी विविध वृत्तपत्रांत लेखन केले. त्यांनी सात ऑलिंपिक स्पर्धा, नऊ आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांचे वार्तांकन केले होते.

त्यांना राज्य शासनाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने; तसेच नानासाहेब परूळ‌ेकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. खेळाडू, मागदर्शक आणि संघटकांसाठी त्यांनी अनेक परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन केले. सावंत यांनी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे सहसचिव आणि उपाध्यक्षपद; तसेच महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे सरचिटणीसपद आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्षपद भूषविले.

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचेही ते वरिष्ठ उपाध्यक्ष होते. जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे ते स्थापनेपासून सरचिटणीस होते. विद्यापीठ क्रीडा मंडळावरही तसेच विविध निवड समित्यांवरही त्यांनी काम केले होते. त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

सावंत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी साडेनऊपासून त्यांचे पार्थिव मरेथॉन भवन येथे ठेवण्यात येणार असल्याचे, अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अभय छाजेड यांनी कळविले आहे.

सावंत यांच्या निधनामुळे म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून सुरू होणारी पुणे जिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता शनिवारी सकाळी आठपासून सुरू होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ