बुद्धिबळ खेळाडूंच्या निवेदनाला क्रीडामंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

पुणे। मा. आमदार सौ मेधाताई कुलकर्णी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, इंटरनॅशनल मास्तर शशिकांत कुतवळ, श्री नरेंद्र सापळे (IWM सलोनी सापळे ह्यांचे वडील), श्री कृष्णातेर (कॉमनवेल्थ चॅम्पियन कुशागर ह्यांचे वडील) ह्यांनी आज बुद्धिळपटूंच्या प्रदीर्घ कालापासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री मा. श्री आशिष शेलार साहेब ह्यांची भेट घेतली.

आशियाई / राष्ट्रकुल व जागतिक बुद्धिबळ स्पर्धामध्ये पदके/अजिंक्यपद मिळवून शासनाच्या रोख बक्षीस योजनेस पात्र असलेल्या राज्यातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना मागील काही वर्षे प्रशासकीय अनास्थेमुळे पाठपुरावा करूनही बक्षीसाची रक्कम मिळू शकलेली नाही. त्याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती मा. मंत्रीमहोदयांना करण्यात आली.

तसेच जवळपास २०० देशांत खेळला जात असलेला, अतिशय लोकप्रिय असलेला बुद्धिबळ हा खेळ महाराष्ट्र सरकारच्या धोरणात क श्रेणीत ढकलला गेला आहे. हे केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाशीही विसंगत आहे. त्यामुळे जागतिक पाताळीवरील आव्हानात्मक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करूनही बुद्धिबळपटूंना सरकार कडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. धोरणात्मक पातळीवर सुधारणा करून बुद्धिबळ ह्या खेळाला योग्य ते उत्तेजन देणे अतिशय गरजेचे आहे. याबाबतही अनेक ठोस कागदपत्रांसहित निवेदन मा. क्रीडामंत्र्यांना देण्यात आले. बुद्धिबळ हा खेळ आता आशियाई खेळांत समाविष्ट करण्यात आला आहे हे देखील त्यांत नमूद करण्यात आले. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा मंत्र्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले.

मा. आमदार सौ मेधाताई कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याने व मा. क्रीडा मंत्री ह्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे, प्रशासकीय पातळीवरही योग्य ते सहकार्य मिळून बुद्धिबळाच्या बाबतीतले हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रगती झाली आहे. उपस्थित सर्व बुद्धिबळपटूंनी ह्याबद्दल क्रीडामंत्र्यांचे व आमदारांचे आभार मानले.