दुसऱ्या देशाकडून खेळणार असल्याचा आरोप एस. श्रीशांतने फेटाळला

बीसीसीआयने २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेला एस श्रीशांत सध्या त्याने एका खाजगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये सारखेच खटके उडत आहेत.

आता तो म्हणाला आहे की त्याच्या दुसऱ्या देशाकडून खेळण्याच्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. त्याला म्हणायचे होते की तो वेगवेगळ्या देशाच्या क्रिकेट लीग खेळू शकतो.

या प्रकरणाची सुरवात झाली होती ते श्रीशांतने दिलेल्या मुलाखतीमुळे तो म्हणाला होता की “माझ्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे, आयसीसीने नाही. त्यामुळे मी दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो. माझे सध्या वय ३४ वर्ष आहे. माझ्यासमोर अजून ६ वर्षांची कारकीर्द आहे. “

जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर तुम्हाला ते खेळायलाही आवडते. फक्त एवढेच नाही तर बीसीसीआय ही खाजगी संस्था आहे. केवळ आपण तिला भारतीय क्रिकेट संघ म्हणतो. त्यामुळे मी एखाद्या दुसऱ्या देशासाठी खेळलो तर ते असेच असेल.

केरळ रणजी संघासाठी खेळणे ही वेगळी गोष्ट आहे. मला केरळकडून खेळायची इच्छा होती परंतु बीसीसीआयने मला तसे करू दिले नाही. ”

त्याच्या या वक्तव्यावर उत्तर देताना बीसीसीआय अध्यक्ष सी. के. खन्ना म्हणाले होते, “आयसीसीच्या नियमांत असे स्पष्ट आहे की जर एखाद्या खेळाडूच्या पालक संघटनेने त्याच्यावर बंदी घातली असेल तर तो खेळाडू अन्य कुठल्याही देशाकडून खेळू शकत नाही.”

यावर श्रीशांतने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केले की त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. तो म्हणाला की “मला त्या दिवशी वाईट वाटलं. मला एवढंच म्हणायचं होत की माझ्यासाठी क्रिकेट महत्वाचं आहे. मी वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट लीग खेळू शकतो.

दुबईत होणारी टी १० त्याचेच एक उदाहरण आहे. जेव्हा माझ्यावरची बंदी उठवली होती तेव्हा मी संघ मालकांना विनंती केली होती. माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला.”

श्रीशांत पुढे म्हणाला की “मला क्रिकेट आवडतं. मी स्पॉट फिक्सिंग सारख्या प्रकरणात अडकणारा शेवटचा खेळाडू आहे. जे मला चांगलं ओळखतात ते मला अशी ऑफर देण्याआधी दोनदा विचार करतील. कारण मी सामना खेळण्याआधी कर्णधाराचं पण ऐकत नाही. मला कुणी १०० कोटी रुपये दिले असते तरी मी असं केलं नसतं.”

“त्याचबरोबर तुम्ही जेव्हा देशासाठी खेळत असता तेव्हा तुमच्याकडे जाहिराती असतात आणि आयपीएलही चालू असतं त्यामुळे तुमच्या दोन ते तीन पिढ्यांनाही पुरेल इतके तुम्ही कमावता. त्यामुळे मी १०- १५ लाखांसाठी अशी चूक का करेन?”

श्रीशांतने बीसीसीआयवरही टीका करताना म्हणाला की ” बीसीसीआय भष्टाचार चालवून घेणार नाही असे म्हणत आहे मग याच संस्थेबद्दल काय? उच्च न्यायालयानेच त्यांना अपराधी ठरवले आहे. लोढा समितीनेही त्यांना बदल करायला सांगितले आहेत. अगदी त्यांच्या घटनेतही, पण बीसीसीआयने त्याला विरोध केला आणि आता त्याविरोधात लढत आहेत.”

“यामुळेच हेच दिसून येते की ते न्यायालयाच्या आदेशांचे किती पालन करतात. पण माझ्या बाबतीत ते न्यायालयाच्या आदेशांचे मात्र पालन करतात, हे खूप विचित्र आहे .

मला याबद्दल काहीच कल्पना नाही की माझ्याबाबतीत या नवीन निर्णय घेणारी कोण किंवा कोणती शक्ती या मागे आहे. माझ्याबरोबर आणखी १३ नावे आरोपी म्हणून होती.”

“त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. बीसीसीआयने कोर्टाला अशीही विनंती केली होती की उर्वरित नावं गुपित ठेवावीत. असे न केल्यास क्रिकेट या खेळावर लोक बदनामी होईल. 

मी सुद्धा त्यांच्या सारखाच एक आरोपी होतो पण मला तुरुंगात पाठवल गेलं ज्यामुळे माझे कुटुंब, राज्य आणि माझ्या चाहत्यांना या सगळ्यातून जावं लागलं. मी या सगळ्यातून निर्दोष बाहेर आलो पण तरीही माझ्या स्पष्टतेबद्दल मला सारखे विचारले जाते. जे मी प्रत्येकवेळी न्यायालयात स्पष्ट केले आहे.”