बीसीसीआय पक्षपाती असल्याचा आरोप श्रीसंतने मागे घ्यावा: कपिल देव

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताचा स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला गोलंदाज एस श्रीसंतला त्याने बीसीसीआयवर केलेल्या पक्षपाती असल्याचा आरोप मागे घ्यावा असे सांगितले आहे. बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे आणि बीसीसीआय आपल्या या निर्णयावर ठाम आहे.

कपिल देव बंगळुरू येथील एका कार्यक्रमात म्हणाले “जर श्रीसंत बीसीसीआयबद्दल असा विचार करत असेल तर त्याच्याकडे त्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी तेवढी कारणे पण हवीत. सगळ्यांना वाटत आहे की त्याने देशासाठी खेळायला हवे पण अखेर फक्त ११ खेळाडू संघात खेळू शकतात.”

श्रीसंतने बीसीसी पक्षपाती आहे असा आरोप केला आहे. सध्या त्याने याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचे यावर म्हणणे आहे की “मला एवढेच म्हणायचे आहे की माझ्याबरोबर अजून १३ जण आरोपी होते. पण त्यांना वेगळी वागणूक मिळत आहे आणि मी याबद्दलच विचारत आहे. मी असे म्हणत नाही की त्यांची नावे उघड करा. याबद्दल कोणाहीपेक्षा मला जास्त माहित आहे कारण मी या सगळ्या वाईट परिस्थितीतून गेलेलो आहे”

त्याच्या अश्या वैयक्तिक मतांबद्दल कपिल देव यांना विचारले असता ते म्हणाले ” श्रीसंतची वैयक्तिक मते आहेत आणि मी त्याच्या वैयक्तिक मतांवर जास्त बोलू शकत नाही “