श्रीलंकेवर पहिल्यांदाच ओढवणार एवढी मोठी नामुष्की !

गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा १६८ धावांनी दारुण पराभव केला आणि असे करताना भारताने श्रीलंकेचे २०१९ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र होण्याचे स्वप्न ही भंग केले.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये १९९६च्या विश्वचषक विजेता असेल्या श्रीलंका संघाला विश्वचषक २०१९ साठी थेट पात्रता मिळवण्यासाठी दोन सामने जिंकणे आवश्यक होते, पण गुरुवारी झालेल्या चौथ्या सामन्यातही श्रीलंकेला हार पत्करावी लागली. श्रीलंकेने या मालिकेत आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही. आयसीसी क्रमवारीत पहिले आठ संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतात. तर बाकी संघाना पात्रता फेरी खेळावी लागते.

श्रीलंकेने या मालिकेत एकही सामना जिंकला नसल्याने आता जरी त्यांनी या मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना जिंकला तरी त्याचा काहीच फरक पात्रतेसाठी पडणार नाही. त्यांना आता दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवाव लागणार आहे. जर पुढील मालिकेत वेस्ट इंडिजने एक सामना जरी हरला तरी श्रीलंकेला पात्रता फेरी खेळावी लागणार नाही पण जर असे झाले नाही तर मात्र श्रीलंकेला पात्रता फेरी खेळावी लागेल.

वेस्ट इंडिजला जर विश्वचषकासाठी थेट पात्र व्हायचं असेल तर त्यांना आयर्लंड विरुद्धचा आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत एक पेक्षा अधिक सामने हारून चालणार नाही.

विश्वचषकासाठीची पात्रता फेरी २०१८ मध्ये खेळवली जाणार आहे. या फेरीत तळातील चार संघ भाग घेतील आणि पहिले येणारे दोन संघ विश्वचषक २०१९ साठी पात्र होतील.

जर विश्वचषक खेळण्यासाठी श्रीलंकेला पात्रता फेरी खेळावी लागली तर ही असे होण्याची पहिलीच वेळ असेल.