श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिला पाकिस्तानला जाण्यास नकार !

श्रीलंका क्रिकेट बोर्डाबरोबर करारबद्ध असलेल्या ४० श्रीलंकन खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डला अर्ज करून सांगितले आहे की पाकिस्तानमधील लाहोर या शहरात होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी२० सामन्याला संघाला जायचे नाही.

पत्रामध्ये श्रीलंकन खेळाडूंनी थेट असे लिहलेले नाही की त्यांना लाहोरला खेळायचे नाही पण त्यांनी असे लिहले आहे की सामन्याचे ठिकाण तरी बदलावे.

“एसएलसी लवकरच खेळाडूं बरोबर चर्चा करेल, आम्हाला त्यांना फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करून द्यायचे आहे पण आता या विषयावर बोलायला लागेलच, ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. शनिवारी त्यांना भेटून आम्ही लाहोरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगणार आहे, ” असे श्रीलंका क्रिकेट बोर्डमधील सूत्रांनी सांगितले.

लाहोरमधील झालेल्या पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड ११ सामन्यात श्रीलंकेचा थिसरा परेरा वर्ल्ड ११ कडून खेळला होता, त्यामुळे त्याने या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही असे म्हटले जात आहे.

२००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानमध्ये दहशदवादी हल्ला झाला होता. लाहोरच्या याच शहरात श्रीलंकेच्या बसवर हा हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सामने बंद करण्यात आले होते.