तिसरी टी २०: श्रीलंकेचे भारताला १३६ धावांचे आव्हान

मुंबई। भारत विरुद्ध श्रीलंका संघात चालू असलेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतीय संघाला १३६ धावांचे आव्हान दिले आहे.

भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयाला योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

जयदेव उनाडकट आणि वॉशिंग्टन सुंदरने सुरवातीलाच भारताला यश मिळवून दिले. श्रीलंकेचे पहिले तीन फलंदाज त्यांनी १८ धावातच बाद केले.

त्यांच्यानंतर आलेले सदिरा समरविक्रमा(२१) आणि असेला गुणरत्ने(३६) यांनी थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही खेळपट्टीवर जास्त टिकून न देता हार्दिक पंड्याने त्यांना बाद केले.

त्यानंतर दसून शनका(२९*) आणि अकिला धनंजया(११*) यांनी अखेरच्या षटकात आक्रमक फटके मारून श्रीलंकेला ७ बाद १३५ धावा अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. श्रीलंकेच्या बाकी फलंदाजांना विशेष योगदान देता आले नाही.

भारताकडून सुंदर(२२/१), उनाडकट(१५/२), पंड्या(२५/२), मोहम्मद सिराज(४५/१) आणि कुलदीप यादव(२६/१) यांनी बळी घेतले.