३००वा वनडे सामना खेळणाऱ्या धोनीला क्लार्कचा खास संदेश

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वांच्या नजरा जर कोणत्या खेळाडूवर असेल तर तो आहे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी. तब्बल २९९ वनडे सामने खेळणाऱ्या या खेळाडूच्या एकूणच कामगिरीवर चाहते, क्रिकेट विश्लेषक, निवड समिती सदस्य लक्ष ठेवून आहे.

आपली निवड संघात का झाली आहे हे धोनीने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात दाखवून दिले आहे. उद्या हा महान खेळाडू ३००वा वनडे सामना खेळणार आहे. याबरोबर अशी कामगिरी करणारा तो जगातील २०वा तर ६वा भारतीय खेळाडू बनणार आहे.

सचिन तेंडुलकर(४६३), राहुल द्रविड (३४४), मोहम्मद अझरुद्दीन(३३४), सौरव गांगुली(३११) आणि युवराज सिंग(३०४) या खेळाडूंनी यापूर्वी ३०० सामने खेळले आहेत. चितगावला २३ डिसेंबर २००४ साली बांगलादेश संघाविरुद्ध वनडे पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला त्यामुळे अनेक खेळाडूंचे संदेश आले आहेत.

त्यातील एक महत्वाचा संदेश आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक मायकल क्लार्कचा. क्लार्क आपल्या संदेशात म्हणतो, ” सध्या भारतीय संघ दोन्ही क्रिकेट प्रकारात खूपच चांगलं क्रिकेट खेळत आहे, तर एमएस धोनी सध्या जबदस्त फॉर्ममध्ये आहे. ”

एमएस धोनीने २९९ वनडे सामन्यात भारताकडून २६६ तर ३ सामने आशिया संघाकडून खेळला आहे. त्यात त्याने एकूण ५१.९३च्या सरासरीने ९६०८ धावा केल्या आहेत.