दिल्ली प्रदूषण आता चेष्टेचा विषय राहिला नाही, श्रीलंकन खेळाडूंना याचा मोठा फटका

दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा कसोटी सामना दिल्लीत असलेल्या प्रदूषणाच्या कारणाने चांगलाच गाजत आहे. आजही त्याचा परिणाम दिसून आला.

भारताचा दुसरा डाव सुरु असताना श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज सुरंगा लकमलला मैदानावरच त्रास झाला आणि त्याने उलटी केली. त्यानंतर लगेचच श्रीलंका संघाचे फिजिओ मैदानावर येऊन त्यांनी त्याला मैदानाबाहेर नेले.

या वेळी श्रीलंकेच्या ८ खेळाडूंनी मास्क घातले होते. फक्त यष्टीरक्षक निरोशन डिकवेल्ला, गोलंदाज लाहिरू गामागे आणि लकमल यांनी हे मास्क घातले नव्हते.

या प्रदूषणामुळे प्रकाशझोताचाही प्रश्न उभा राहत आहे. सकाळी मैदानावरील फ्लडलाइट्स चालू करण्यात आल्या होत्या.

भारतीय खेळाडूंनी मात्र या सामन्यात मास्क घातले नव्हते. या सामन्यात रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील श्रीलंकन खेळाडूंनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती.