श्रीराम, बंड्यामारुती, जय शिव, गोलफादेवी उपांत्य फेरीत दाखल

बंड्या मारुती, गोलफादेवी या दोन मुंबई शहराच्या संघांबरोबर पालघरचा श्रीराम आणि बदलापूर- ठाण्याचा जय शिव यांनी उजाला क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. या स्पर्धेत श्रीराम विरुद्ध बंड्या मारुती, जय शिव विरुद्ध गोलफादेवी अशा उपांत्य लढती होतील.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो; ठाणे जिल्हा कबड्डी असो.यांच्या मान्यतेने भिवंडी येथील तलाव गार्डन मैदानात सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात बंड्या मारुतीने उपनगरच्या स्वस्तिकचे आव्हान २९-२४ असे परतवून लावले. विनोद अत्याळकर, सागर पाटील यांच्या चढाई-पकडीच्या खेळणे मध्यांतराला १६-०८अशी आघाडी घेणाऱ्या बंड्या मारुतीला उत्तरार्धात थोडा प्रतिकार झाला. पण तो विजयाकरिता पुरेसा नव्हता. उत्तरार्धात थोड्या फार चकमकी वगळता स्वस्तिकच्या सुयोग राजापकर, अक्षय बरडे यांचा खेळ म्हणावा तसा भरला नाही.

श्रीराम संघाने जय बजरंगचा ४३-१९असा पराभव करीत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला विजयी संघाकडे २३-०७अशी भक्कम आघाडी होती. दौलत साळुंखेच्या नेत्रदीपक चढाया त्याला शैलजा ढोणेची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. जय बजरंगचा स्वप्नील लोखंडे बरा खेळला. गोलफादेवीने हनुमानला ३३-१६असे नमवित आगेकूच केली.मध्यांतराला १७-०६अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीच्या विजयात सिद्धेश पिंगळे, अक्षय बिडू यांचा खेळ लक्षणीय होता. हनुमानचा आशिष शिंदे चमकला.

शेवटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय शिवने श्री समर्थचा प्रतिकार ३१-२१असा संपविला. अत्यंत चुरशीनें खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यांतराला १३-१२अशी निसटती आघाडी होती. ही चुरस शेवटची ५मिनिटे पुकारे पर्यंत होती. त्यावेळी २०-१९अशी आघाडी जय शिवकडे होती.नंतर मात्र गुण मिळविण्याच्या नादात समर्थचा संयम संपला आणि त्यांचा १०गुणांनी पराभव झाला. अनिकेत कुलकर्णीच्या झंजावाती चढाया त्याला शुभम आणि पंकज या सिंग बंधूंची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे जय शिवने हा विजय साकारला. समर्थच्या निखिल आणि धीरज या म्हात्रे बंधूंना मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यात आलेले अपयश यामुळे त्यांना पराभवाचा झटका बसला.

या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात श्रीरामने स्व.आकाशचा (२५-२४); श्री समर्थने सिंहगडचा ३१-२४; स्वस्तिकने शिवशंकरचा २४-२३; बंड्या मारुतीने मावळी मंडळचा ३५-२२; हनुमानाने ओम भिवंडीचा ४४-२५; गोलफादेवीने छत्रपतीचा ३१-२१ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.