के. श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत

भारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांत डेन्मार्क ओपन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीत हॉंगकॉंगच्या वाँग विंग कि विन्सन्टचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

या सामन्यात श्रीकांत आणि वाँग मध्ये कडवी झुंज बघायला मिळाली. ३९ मिनटे चाललेल्या या सामन्यात श्रीकांतने सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्या सेटमध्ये ११-६ अशी आघाडी घेतली होती. परंतु वाँगने पुनरागमन करत आघाडी कमी करत १४-१० अशी केली. दोघेही एकमेकांना कोणतीही संधी न देता आपला खेळ करत होते. अखेर श्रीकांतने २१-१८ असा सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही या दोघांनी आपापले अनुभव पणाला लावले होते. या सेटमध्ये त्यांची १५- १५ अशी बरोबरी झाल्यानंतर मात्र श्रीकांतने उत्तम खेळ करत वाँगला आघाडी घेऊन दिली नाही. आणि अखेर हा सेट २१-१७ असा जिंकत सामनाही जिंकला.

या विजयाबद्दल श्रीकांत म्हणाला कि ” मला छान वाटतंय. मला चांगलाच खेळ करायचा होता. आमचा खेळ सारखा होत होता पण मी जास्त संयम दाखवला. मी सामन्यात काही चुका केल्या पण मी त्या लवकर सुधारल्या. या नंतर माझा सामना लीशी होणार आहे. मी या आधी कधी त्याच्याशी खेळलो नाही. त्यामुळे माझ्या मते त्याच्या बरोबर खेळणे अवघड असेल.”

श्रीकांतचा अंतिम सामना दक्षिण कोरियाच्या ली ह्युनशी आज होणार आहे. श्रीकांतने यावर्षी इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत आणि सिंगापुर ओपनच्या अंतिम फेरीत उपविजयी झाला आहे. त्यामुळे जर तो डेन्मार्क ओपेनही जिंकला तर तो वर्षातली तिसरी सुपर सिरीज जिंकेल.