सृजनसारख्या स्पर्धांमुळे गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना सुवर्णसंधी – शरद पवार

स्व.चंचला कोद्रे क्रीडा संकुलाचे शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन

पुणे: इंडियन प्रिमियर लीग(आयपीएल)या स्पर्धेमुळे छोट्या गावांतील-शहरातील खेळाडूंना जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रात अनेक गुणवान खेळाडू तयार झाले आहेत, सृजनसारखी स्पर्धा हि उद्याच्या आयपीएलचेच एक लहान स्वरूप आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे पुण्यातील गुणवान खेळाडूंना आपले कौशल्य दाखबिण्याचीच संधी मिळणार असून रोहित पवार केलेला हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा अशी इच्छा  माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या औचित्याने मुंढवा येथील स्व. चंचला कोद्रे क्रीडा संकुलाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, विजेतेपदाच्या करंडकाचे  अनावरणही पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार रामभाऊ मोझे, माजी महापौर प्रशांत जगताप, कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष कैलास कोद्रे , संदिप कोद्रे, पुजा कोद्रे, धीरज जाधव, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, शैलेश लडकत, स्मिता लडकत, सुनील चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते व छत्रपती पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, माया आकरे, कॅप्टन गोपाल एन देवांग, मनोज पिंगळे, शांताराम जाधव, सलमान शेख, विजय गुजर, विजय यादव या खेळाडूंची सन्मान करण्यात आला.

रोहित पवार यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन गेल्या काही दिवसात केले असून त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यांतील हजारो मुले-मुलींना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. परंतु हे कायमस्वरूपी चालण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. या क्रीडा संकुलाची कंपनी ऍक्ट खाली नोंदणी करून त्या उत्पन्नांतून या क्रीडा संकुलाची देखभाल उत्तमरीतीने केली गेली पाहिजे. मी मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील अनेक संस्थांचा अध्यक्ष आहे. मुंबईतील गरवारे क्लब या संस्थेचे 21000हुन अधिक सदस्य आहेत आणि त्या उत्पन्नांतून सर्वोत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा हा क्लब खेळाडूंना देत असतो. याच धर्तीवर चंचला कोद्रे क्रीडा संकुलाचाही कारभार चालविण्यात यावा. परंतु त्याचवेळी लहान मुलांना ना नफा, ना तोटा तत्वावर या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे पवार यांनी नमूद केले.

पवार पुढे म्हणाले कि, ज्यांच्या नावाने हे क्रीडा संकुल उभारले जात आहे, त्या चंचला कोद्रे यांनी पुण्याचे महापौर असताना इथे हॉस्पिटल, पर्यावरण उद्यान आणि ग.प्र.प्रधान यांच्या नावानेही आणखी एक उद्यान उभारण्यात पुढाकार घेतला होता. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देतानाही त्याच महापौर होत्या आणि हडपसर कोंढवा परिसरात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. शारीरिक व्याधींशी झुंज देत असतानाही त्यांनी अखेरपर्यंत समाजकार्य सुरु ठेवले. त्यामुळे हे क्रीडा संकुल त्यांच्या नावाने उभारणे हि त्यांच्या कार्याला दिलेली एक श्रद्धांजलीच आहे.