उदयोन्मुख खेळाडूंसाठी सृजन करंडक आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर

पुणे: छोट्या छोट्या गावातील आणि विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी सृजन करंडकासारख्या स्पर्धेतून उत्तम संधी मिळत आहे, त्यामुळे हि स्पर्धा अशा खेळाडूंसाठी आदर्श म्हणावी लागेल, असे उदगार भारताच्या विश्वचषक संघातील खेळाडू गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू असलेल्या टेनिस बॉलवर खोळल्या जाणा-या सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सत्राच्या प्ले ऑफ लढतींचे उदघाटन भारताच्या विश्वचषक संघातील खेळाडू गौतम गंभीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

गंभीर पुढे म्हणाला कि, गेल्या 15-20वर्षांपूर्वी केवळ शहरांतील खेळाडू मोठ्या संघांमध्ये खेळताना दिसत असत. परंतु आता ग्रामीण विभागातही अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षणाची व्यवस्था मिळत असल्यामुळे छोट्या शहरांतील किंवा ग्रामीण विभागातील खेळाडूही आता राज्य किंवा राष्ट्रीय संघापर्यंत पोहचू लागले आहेत.यातून आपल्याला ग्रामीण विभागापर्यंत सोइ सुविधा पोहचविण्याचे महत्व समजून येते.

महिला क्रिकेटलाही काही वर्षांपूर्वी दुय्यम महत्व दिले जात होते. मिडियासुद्धा महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करीत होता, परंतू गेल्या काही वर्षात महिला क्रिकेटने केलेल्या दैदीप्यमान प्रगतीमुळे बीसीसीआयने आणि माध्यमांनी सुद्धा महिला क्रिकेटला महत्व देणे सुरु केले आहे. परंतु याचे श्रेय महिला क्रिकेटपटूंनाच द्यावे लागेल. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेतही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आणि आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे त्याने सांगितले.

गंभीर पुढे म्हणाला कि, अशा छोट्या स्पर्धामधूनच कारकिर्दीतल्या मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता खेळाडूंमध्ये निर्माण होते. यांसारख्या स्पर्धांमध्ये खेळून मिळालेल्या अनुभवाचा फायदा या खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये होत असतो त्यामुळे रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या सृजन करांडकसारख्या स्पर्धेला अतिशय महत्व आहे. समाजाने आणि देशाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्याची परतफेड करण्याची संधी मी शोधत असतो. ट्रान्स जेंडर लोकांच्या संघटनेसाठी मी करीत असलेले काम हे अशाचप्रकारचे असून सामाजिक रुणाची ती परतफेडच म्हणावी लागेल.