Australian Open 2018: स्टॅन वावरिंकाचा पहिल्या फेरीत विजय

मेलबर्न। स्विझर्लंडचा टेनिसपटू स्टॅन वावरिंकाने आज ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. त्याने २ तास ४७ मिनिटे चाललेल्या या लढतीत रिचर्ड्स बेरांकीसचा ६-३,६-४,२-६,७-६(७-२) अशा फरकाने पराभव केला.

या स्पर्धेसाठी नववे मानांकन असणाऱ्या वावरिंकाने गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच टेनिस सामना खेळला आहे. तो याआधी मागीलवर्षी जुलै महिन्यात पार पडलेल्या विम्बल्डन स्पर्धेत पहिल्या फेरीत शेवटचे खेळला होता. त्या सामन्यात तो पराभूत झाला होता.

वावरिंकाने आज झालेल्या सामन्यात पहिले दोन सेट सहज जिंकले मात्र तिसऱ्या सेटमध्ये रिचर्ड्स बेरांकीसने पुनरागमन करत हा सेट जिंकला. सामन्यातील चौथा सेट टाय ब्रेकमध्ये गेल्यानंतर वावरिंकाने तो ७-६(७-२) असा जिंकत सामनाही आपल्या नावावर केला.

सामन्यानंतर वावरिंका म्हणाला’ ” हि लढत सोपी नव्हती. ६ महिन्यानंतर खेळलेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे मी आनंदी आहे. “