कबड्डीच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनाची तारीख जाहीर

कबड्डीच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनाची तारीख जाहीर झाली आहे. ३१ डिसेंबरपासून ही स्पर्धा गाचीबोवली इनडोअर स्टेडियम हैद्राबाद येथे होणार आहे.

भारतीय कबड्डी संघ गेल्याच आठवड्यात गोरगन, इराण येथे झालेली एशियन कबड्डी चॅम्पियनशिप पुरुष आणि महिला गटात जिंकून आला आहे. भारताने या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनवेळा पराभूत केले.

राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या राज्याकडून भाग घेताना प्रो कबड्डी आणि राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू खेळताना दिसतील.

गेले ३-४ महिने लीग सामने खेळलेल्या खेळाडूंना आता राष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागणार आहे. कबड्डी खेळात सध्या मोठ्या प्रमाणावर तरुण खेळाडू भाग घेत आहेत आणि प्रो कबड्डीच्या कामगिरीवर अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे.

या स्पर्धेत तरुण खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. जे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये विरोधी संघात दिसले त्यातील अनेक खेळाडू एकाच संघांकडून खेळताना दिसणार आहे.

ज्या स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे ते गाचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये एकावेळी ५ हजार प्रेक्षक बसू शकतात. या स्टेडियमवर आजपर्यत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्थरावरील स्पर्धा झाल्या आहेत.

कबड्डीची सध्या देशात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर प्रो कबड्डीबरोबर अन्य स्पर्धाही पाहतात. त्यामुळे पुन्हा एकदा कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणीच ठरणार आहे.