राज्य कबड्डी पंच शिबिर मालवण येथे संपन्न

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंच उजळणी शिबिराचे उद्घाटन मालवण नगरपरिषदचे नगराध्यक्ष श्री महेश कांदळगावकर यांच्या हस्ते दीप दीप प्रज्वलनाने झाले .

याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मीनानाथ धानजी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच मंडळ अध्यक्ष रमेश हरयाण, सचिव दत्ता झिंजुर्डे, माजी पंचमंडळ सचिव शशिकांत राऊत, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन उपाध्यक्ष रूजारीओ पिंटो,खजिनदार मार्टिन आल्मेडा, कार्यवाह दिनेश चव्हाण, मालवण तालुका कबड्डी असोसिएशनचे मंदार ओरस्कर ,नितिन हडकर, रेनॉल्ड बुतेलो तसेच राज्य पंच मंडळ व जिल्हा पंच मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिबिरासाठी उपस्‍थित एकुण ६० राज्य राष्ट्रीय स्तरावरील पंच उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मालवण नगराध्यक्ष श्री महेश कांदळगावकर म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्याच राज्य पंच शिबिराच्या आयोजनासाठी मालवण हे स्थळ निवडल्याबद्दल मालवण नगरपरिषदेच्या वतीने सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.मालवण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसेच कला, क्रीडा व साहित्यासाठी सुद्धा ही प्रसिद्ध आहे .

याचे उदाहरण देताना ते म्हणाले की आजच्या राज्य पंच शिबिराचे आयोजन प्रमुख श्री रुजारीआओ पिंटो हे स्वतः कबड्डीपटू होते तसेच ते राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कवी सुद्धा आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांचा कबड्डी खेळ पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

मालवणात फक्त नारळी पौर्णिमेनिमित्त कबड्डी स्पर्धा होत असे व ती पाहण्यासाठी आम्ही गर्दी करत असू. परंतु हल्ली मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कबड्डी स्पर्धाचे आयोजन होत आहे. तालुक्या-तालुक्यात अनेक संघ निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात कबड्डी खेळाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. तालुका कबड्डी संघटना स्थापन करून गाव पातळीवर युवकांना कबड्डी खेळाकडे वळविले जात आहे. याचे सर्व श्रेय सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनला जाते.

मालवणात जिल्हा, राज्य स्पर्धांचे आयोजन आणि मुलामुलींचे चांगले संघ निर्माण करण्यासाठी मंदार ओरस्कर, नितिन हडकर रेनॉल्ड बुतेलो मेहनत घेत आहेत. त्यांचे त्यांनी कौतुक केले. शिबिराच्या निमित्ताने उपस्थित शिबिरार्थींना उद्देशून ते म्हणाले की पंच म्हणजे त्या सामन्याचा न्यायाधीश आहे, त्यामुळे अचूक निर्णय क्षमता पंचामध्ये असणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकामध्ये बोलताना दिनेश चव्हाण यांनी या पंच शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील कार्यरत पंचांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञांचे मार्गदर्शन लाभावे व जिल्ह्यातील पंचांची कामगिरी उंचवावी राज्यभरातील पंचांना जिल्ह्यातील पर्यटनाचा आस्वाद घेता यावा हा उदात्त हेतू असल्याचे सांगितले . तर राज्य पंचमंडळ सचिव दत्ता झिंजुर्डे यांनी नवनियुक्त राज्य पंच मंडळाच्या वतीने राज्यातील पंचांना अधिक सक्षम करण्यासाठी या पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष यांनी सर्वांचे स्वागत करताना आपल्या मालवणी व कोकणी कवितांच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. उद्घाटनानंतर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे राज्य पंच शिबिराला मीनानाथ धानजी, शशिकांत राऊत, रमेश हरयाण, दत्ता झिंजुर्डे ,अजित पाटील, सुहास पाटील ,मालोजी भोसले आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार आयोजकांच्या व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या वतीने करण्यात आला. दुपारच्या सत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्रीडाधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी पंच शिबिराला शुभेच्छा देताना आपण स्वतः या जिल्ह्यात क्रीडाशिक्षक म्हणून होतो, त्यावेळी श्री दिनेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी पंच म्हणून कामगिरी करत होतो. मी राष्ट्रीय पंच म्हणून राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कामगिरी केली आहे. त्यामुळे माझ्यात निर्णय क्षमता व तडफदारपणा आपोआपच आला त्याचाच उपयोग मला आता प्रशासनात काम करताना होत आहे.

जिल्ह्यातील सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे काम हे खरोखरच कौतुकास्पद असून त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले असे आपल्या मार्गदर्शन भाषणात त्यांनी आपले मत मांडले