राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे- मुंबई शहरला विजेतेपद

४५व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुण्याने कुमार गटात गतविजेत्या कोल्हापूरला ४३-२४असे पराभूत करीत ” स्व. नारायण नागु पाटील चषकावर” आपले नाव कोरले.

तर कुमारी गटात मुंबई शहराने गतउपविजेत्या साताऱ्याला ३३-३२असे चकवित “स्व. चंदन सखाराम पांडे चषक” आपल्याकडे खेचून आणला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती.

शेलू-परभणी येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरीत झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने कोल्हापूरचा अगदी सहज पाडाव केला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीनें खेळला गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला १८-१६ अशी नाममात्र आघाडी पुण्याकडे होती.

या डावात कोल्हापूरवर होणारा लोण त्यांनी दोन वेळा अव्वल पकड करीत पुढे ढकलला. पण उत्तरार्धात पुण्याने जोरदार मुसंडी मारत पहिल्या पाच मिनिटात कोल्हापूरवर लोण देत आघाडी घेतली.

त्यानंतर आणखी दोन लोण देत त्यांनी सामना एकतर्फी केला. उत्तरार्धात कोल्हापूरचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला. उत्तरार्धात अभिषेक भोसले, पवन करांडे, अभिजित चौधरी यांनी टॉप गियर टाकत चढाई – पकडीत भराभर गुण घेत पुण्याला १९ गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय मिळवुन दिला.

कोल्हापूर कडून सौरभ पाटील, तेजस पाटील, प्रथमेश साळवी यांनी पूर्वार्धात दाखविलेला जोश उत्तरार्धात मात्र त्यांना दाखविता आला नाही. म्हणूनच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मुलींचा अंतिम सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. यात मुंबईने केलेला एकमात्र बोनस गुण त्यांना विजयासाठी महत्वाचा ठरला. पहिल्या डावात मुंबईने भक्कम बचाव व आक्रमक चढाईच्या जोरावर साताऱ्यावर दोन लोण देत विश्रांतीला २१-०६ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला.

पण उत्तरार्धात या पायाला साताऱ्याच्या सोनाली हेळवीने सुरुंग लावला.त्याला मुंबईने देखील अति सावध पवित्रा घेत साथ दिली. तिने वैष्णवी व प्रतीक्षा जगताप यांच्या सहाय्याने मुंबईने दिलेल्या दोन लोणची परतफेड करीत सामन्यात चुरस निर्माण केली.

पण बोनस गुण साताऱ्याच्या विजयात अडसर ठरला. प्रतीक्षा तांडेल, ऋणाली भुवड यांच्या धारदार चढाया त्याला जागृती घोसाळकर, ज्योती डफळे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे शेवटी मुंबईने एका गुणाने हा विजय साकारला.

नोव्हेंबर २०१३ साली वाडा-ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत मुंबईने अंतिम विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्यांना ही संधी उपलब्ध झाली. या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने पालघरला, कोल्हापुरने ठाण्याला, तर मुलींच्या उपांत्य सामन्यात मुंबई शहरने रत्नागिरीला आणि साताऱ्याने कोल्हापूरवर मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅडलेड कसोटी विजयामुळे टीम इंडियाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग

दुखापतीनंतर हार्दिक पंड्या या संघाकडून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज

ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या स्पर्धेत नाणेफेकी ऐवजी या अनोख्या पद्धतीचा होणार अवलंब