विक्रोळीत होणार स्वराज्य प्रतिष्ठानची राज्यस्तरीय पुरुष व महिला व्यावसायीक कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वराज्य प्रतिष्ठान विक्रोळी या संस्थेच्या वतीने दि. १० ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत कै. रवींद्र म्हात्रे क्रीडांगण, विकास कॉलेज समोर,कन्नमवार नगर-२ विक्रोळी पूर्व मुंबई ८३ येथे आमदार सुनील राऊत चषक व्यवसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कबड्डी स्पर्धेत एकूण पुरुष गटाचे १६ संघ आणि महिला गटाचे १२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत पहिले तीन दिवस साखळी सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येतील. ही स्पर्धा मॅट वर खेळवण्यात येणार असून त्यासाठी दोन मॅटची क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहेत.

पुरुष गटात विजयी संघास आमदार चषकसह १,००,००१ रु.,उपविजयी संघास ५५,५५५ रु., उपांत्य उपविजयी संघास ३३,३३३ रु. बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तर महिला गटात आमदार चषकासह विजयी संघास ५५,५५५ रु., उपविजयी संघास ३३,३३३ रु., उपांत्य उपविजयी संघास २२,२२२ रु. बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई, पकड व सर्वांत्कृष्ट खेळाडूस रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी संघ- पुरुष गटात एयर इंडिया, भारत पेट्रोलियम, महेंद्रा अँड महेंद्रा, देना बँक, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, महावितरण, युनियन बँक, नाशिक आर्मी, मनपा, बँक ऑफ इंडिया, आयकर पुणे आदी संघ सहभागी होणार आहेत. तर महिला विभागात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, ठाणे मनपा, मुंबई मनपा, देना बँक, साई सिक्युरिटी, महावितरण आदी मातब्बर संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धा आयोजक- “स्वराज्य प्रतिष्ठान” विक्रोळी ही संस्था स्पर्धेचे आयोजन करणार असून आमदार सुनील राऊत कबड्डी चषक यानावाने स्पर्धा होणार आहे.

स्पर्धाचा कालावधी- या राज्यस्तरीय व्यवसायिक पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन १० जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान पाच दिवस करण्यात आले आहे. सामने सायंकाळ सत्रात दोन मॅटच्या क्रीडांगणवर होतील.

स्पर्धाचे ठिकाण- कै. रवींद्र म्हात्रे क्रीडांगण, विकास कॉलेज समोर,कन्नमवार नगर-२ विक्रोळी पूर्व मुंबई ८३