राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद

पु. ना. गाडगीळ यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने सोमणस् हेल्थ क्लबतर्फे आयोजन

पुणे । पुण्याच्या वरिष्ठ महिला व पुरुष संघाने राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या स्पर्धेतून लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

पु. ना. गाडगीळ यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने सोमणस् हेल्थ क्लब व पुणे जिल्हा अ‍ॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

डी. पी. रस्त्यावरील गोल्डन लीफ लॉन्स येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते झाले. यावेळी पु. ना. गाडगीळचे सौरभ गाडगीळ, इन्कम टॅक्स विभागाच्या अतिरिक्त आयुक्त एकता बिश्नोई, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर भोईर, सचिव संजय सरदेसाई, पुणे जिल्हा अ‍ॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजहंस मेहेंदळे, सचिव अ‍ॅड. रवींद्र यादव, विनेश त्यागी, उपस्थित होते.

या स्पर्धेत वरिष्ठ महिला गटात ६० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले, तर ठाण्याचा संघ ४६ गुणांसह उपविजेता ठरला. ज्युनियर गटात ठाण्याचा संघाने ५४ गुणांसह विजेतेपद मिळवले, तर पुण्याचा संघ (५४ गुण) उपविजेता राहिला.

सब-ज्युनियर गटात मुंबई उपनगर संघाने ४५ गुणांसह विजेतेपद मिळवले, तर ४२ गुणांसह ठाण्याचा संघ उपविजेता राहिला. वरिष्ठ गटात पुण्याची शर्वरी इनामदारने (३७१ गुण) स्पर्धेतील स्ट्राँग वूमनचा किताब मिळवला. ज्युनियर गटात ठाण्याच्या सुष्मीता देशमुखने (३६४ गुण), तर सब-ज्युनियर गटात कॅव्होलिनने हा मान मिळवला. मास्टर गटात पुण्याची एकता विश्नोई (३२१ गुण) ही स्ट्राँग वूमन ठरली.

वरिष्ठ पुरुष गटात पुणे संघाने ५७ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले, तर ठाण्याचा संघ ५० गुणांसह उपविजेता राहिला. मास्टर गटात पुणे संघाने (६०) विजेतेपद, तर ठाणे संघाने (५१) उपविजेतेपद मिळवले.

सब-ज्युनियर गटात पुणे संघाने (५३) विजेतेपद, तर मुंबई उपनगरने (४७) उपविजेतेपद पटकावले. ज्युनियर गटातही पुण्यानेच (५०) बाजी मारली, तर मुंबईच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सब-ज्युनियर गटात स्ट्राँग मॅनचा किताब ठाण्याच्या प्रथम पलांडेने (३१२) मिळवला. ज्युनियर गटात अहमदनगरचा अक्षय काळे (३८६), तर सिनियर गटात पुण्याचा गौरव घुले (४२०) हा स्पर्धेतील स्ट्राँग मॅन ठरला. मास्टर गटात नितीन म्हाळस्करने (३३४) हा किताब मिळवला.