दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथ्या सामन्यात होणार हे खास विक्रम

जोहान्सबर्ग । आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या वनडे सामन्यात अनेक विक्रम होण्याची शक्यता आहे. भारताने या मालिकेत पहिल्या ३ सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले असून आज चौथा सामना जिंकून भारत दक्षिण आफ्रिकेत प्रथमच मालिका विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आजचा सामना हा भारताचा सलामीवीर शिखर धवनचा १००वा वनडे सामना असून त्याने आजपर्यंत ९९ वनडे सामन्यात ४५.६५च्या सरासरीने ४२०० धावा केल्या आहेत. यात १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे.

-भारतीय संघाकडून १००व्या वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर आहे. गांगुलीने १००व्या वनडेत ९७ धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्याची आज शिखरला मोठी संधी आहे.

-९९ वनडे सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन (४२००) दुसऱ्या स्थानावर. अव्वल स्थानी ४७९८ धावांसह दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला आहे.

-शिखर धवन आज जेव्हा १००वा वनडे सामना खेळायला मैदानात उतरेल तेव्हा तो १०० सामन्यानंतर वनडेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. विराट कोहलीने १००व्या वनडे सामन्यानंतर ४०८५ धावा केल्या होत्या.

-शिखर धवनने ९९ सामन्यात ३७ पेक्षा अधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा भारताकडून विक्रम आहे.