श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय

श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने आज (11 सप्टेंबर) वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकत दौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे. त्यांनी श्रीलंकेवर पहिल्या वनडे सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला आहे.

श्रीलंका विरुद्ध भारत संघात सुरु असलेली ही वनडे मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशीपमधील पहिलीच वनडे मालिका आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना त्यांनी भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 99 धावांचे माफक आव्हान ठवले.

हे आव्हान भारतीय महिलांनी 20 षटकांच्या आतच सहज पार केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्म्रीती मानधनाने आक्रमक खेळ केला तर तिला पुनम राऊतने भक्कम साथ दिली.

स्म्रीतीने 76 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. या खेळीत तिने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच तिला साथ देणाऱ्या पुनमने 41 चेंडूत 2 चौकार मारताना 24 धावा केल्या. या दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचली.

पण विजयासाठी केवळ 3 धावांची गरज असताना पुनमला इनोक राणवीराने बाद केले. परंतू तोपर्यंत भारत विजयाच्या समीप पोहचला होता. अखेर मानधनाने लाँग आॅफला चौकार मारत भारताचा विजय निश्चित केला.

तत्पूर्वी भारतीय महिला गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या महिला फलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अटापट्टूने थोडी फार लढत दिली. पण तिला दिप्ती शर्माने 33 धावांवर खेळत असताना बाद केले.

श्रीलंकेकडून या सामन्यात अटापट्टूनेच सर्वाधिक धावा केल्या. तसेच तिच्या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांपैकी फक्त दिलानी मनोदरा(12) आणि श्रीपाली विराक्कोडी(26) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली. पण अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.

या सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स मानसी जोशीने घेतल्या. तिने 16 धावात 3 विकेट्स घेतल्या. तर अन्य भारतीय गोलंदाजांपैकी झुलन गोस्वामी(2/13), पुनम यादव(2/13), राजश्री गायकवाड(1/18), दिप्ती शर्मा(1/16) आणि दयालन हेमलता(1/19) यांनी विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकला मिळाली ३३ बिअर बॉटल्सची भेट

अवघ्या नऊ धावांनी कोहलीचा तो विक्रम हुकला