स्टिव्ह स्मिथचे झाले राजस्थानच्या संघात रॉयल स्वागत…

आयपीेएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच संघातील परदेशी खेळाडूंचे भारतात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथचेही आज(17) जयपूर येथे राजस्थान संघाच्या कॅम्पमध्ये आगमन झाले आहे.

याबद्दल राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडेलवरुन माहिती देण्यात आली आहे. त्यांनी स्मिथचा राजस्थानी पगडी घातलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन दिले आहे की ‘या फोटोची तूम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. स्मिथ परत आला आहे.’

त्याचबरोबर स्मिथने चाहत्यांना दिलेल्या एका संदेशाचा व्हिडिओही राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मिथने म्हटले आहे की ‘जयपूरमध्ये रॉयल्स कुटुंबात परतल्याने चांगले वाटत आहे आणि यावर्षीच्या आयपीएलसाठी उत्सुक आहे.’

स्मिथनेही आयपीएलसाठी उत्सुक असल्याचे ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

स्मिथवर मागीलवर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. त्यामुळे बीसीसीआयनेही स्मिथचा मागील वर्षाचा आयपीएलचा करार रद्द केला होता. यामुळे स्मिथ मागीलवर्षी आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

स्मिथ बरोबरच चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेल्या वॉर्नरवरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली होती. तोही मागीलवर्षी आयपीएलमध्ये खेळला नव्हता. या दोघांवरील ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाची बंदी येत्या 28 मार्चला उठणार आहे. या दोघांनीही नुकतीच संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची भेट घेतली आहे.

हे दोन्ही क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी आयपीएलमध्ये खेळण्यास आता सज्ज झाले आहेत.

23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आय़पीएलच्या 12 व्या मोसमातील राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 25 मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्जच्या अँथम साँगवर धोनी, केदार, हरभजनने धरला ठेका, पहा व्हिडिओ

कॅप्टनकूल एमएस धोनीने वाचवले या भारतीय गोलंदाजाचे करियर…

या कारणामुळे रिषभ पंत म्हणतो, माझी धोनीबरोबर तुलना नको…