…म्हणून स्टिव्ह स्मिथच्या रनआऊटचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बर्मिंगहॅम। गुरुवारी(11 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकात एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यांचे 2019 विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी पहिल्या तीन विकेट 7 षटकांच्या आत 14 धावांवरच गमावल्या. अशा बिकट परिस्थितीत ऑस्ट्रेलिया असताना स्टिव्ह स्मिथने एक बाजू सांभाळली.

त्याने पहिल्यांदा ऍलेक्स कॅरेला साथीला घेतले तर नंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल स्टार्कला साथीला घेत ऑस्ट्रेलियाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.

मात्र स्मिथ 48 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मजेशीर पद्धतीने धावबाद झाला. या षटकात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर स्मिथने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतू इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलरने चपळाईने चेंडू नॉन-स्ट्रायकर एन्डच्या स्टम्पच्या दिशेने फेकला.

गमतीचा भाग म्हणजे स्मिथ पळत असताना बटलरने फेकलेला चेंडू स्मिथच्या दोन्ही पायांच्या मधून जाऊन थेट स्टम्पला लागला. चेंडू स्टम्पला लागण्याआधी स्मिथला क्रिजमध्ये पोहचण्यात अपयश आले. त्यामुळे तो 119 चेंडूत 85 धावा करुन धावबाद झाला.

स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळताना ऍलेक्स कॅरे(46) बरोबर चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मिथने स्टार्कला(29) साथीला घेत आठव्या विकेटसाठी त्याच्याबरोबर 51 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 49 षटकात सर्वबाद 223 धावा करता आल्या.

इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि आदिल राशिदने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने 124 धावांची सलामी भागीदारी रचली. बेअरस्टो 34 धावा केल्या. तर रॉयने 65 चेंडूत 85 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

हे दोघे बाद झाल्यानंतर इयान मॉर्गनने नाबाद 45 आणि जो रुटने नाबाद 49 धावांची खेळी करत इंग्लंडला 32.1 षटकातच विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने विश्वचषकात हा मोठा पराक्रम करत रचला इतिहास

आता राशिद खान सांभाळणार अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद!

विश्वचषकासाठी संघातील समावेश प्रकरणाबाबत डिविलियर्सने सोडले मौन, केला मोठा खूलासा