चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आयसीसीची स्मिथवर बंदी तर बॅनक्रोफ्टला डिमेरिट पॉईंट्स

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामान्यादरम्यानचे चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले आहे. आयसीसीनेही या प्रकरणात स्टीव्ह स्मिथला आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्टला दोषी ठरवताना त्यांच्यावर शिक्षेची कारवाई केली आहे.

चेंडू छेडछाड प्रकाणाबद्दल आयसीसीने खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेच्या नियमाखाली या दोघांवर कारवाई केली आहे. स्मिथवर एका सामन्याची बंदी आणि १००% दंडाची कारवाई केली आहे. त्याला २ सस्पेंशन पॉईंट्स देण्यात आले आहेत ज्यामुळे त्याच्यावर पुढील कसोटी सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्याच्या खात्यावर आता ४ डिमेरिट पॉईंट्सही जमा झाले आहेत.

याचबरोबर आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल २ च्या नियमानुसार बॅनक्रोफ्टला सामना फीच्या ७५% दंड आणि ३ डिमेरिट पॉईंट्स देण्यात आले आहे. या दोघांनीही या शिक्षा मान्य केल्या आहेत.

शनिवारी द. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट आणि स्मिथने चेंडूबरोबर छेडछाड केल्याचे मान्य केले होते. तसेच बॅनक्रोफ्ट पिवळ्या रंगाचा टेप त्याच्या पॅन्टमध्ये लपवत असताना टीव्ही कॅमेरामध्ये त्याची ही क्रिया कैद झाल्याने तो पकडला गेला होता.

या प्रकरणाबाबत या दोघांनीही शनिवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत चूक झाल्याची मान्य केली होती. त्यानंतर काल स्मिथला कर्णधारपदावरून तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

हे प्रकरण गाजत असतानाच ऑस्ट्रेलिया संघाला काल पराभवाचा धक्काही बसला. द. आफ्रिकेने तिसरा कसोटी सामना काल ३२२ धावांनी जिंकून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ३० मार्चपासून सुरु होणार आहे.