स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदावर कायम राहील – जेम्स सदरलँड

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूबरोबर छेडछाड करण्याचा धक्कादायक प्रकार काल सर्वांसमोर आला आहे. तसेच हा प्रकार केले असल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मान्य देखील केले. 

या प्रकरणानंतर स्मिथने कर्णधारपद सोडावे अशी मागणी झाली होती. पण यावर स्मिथने तो अजूनही या पदासाठी योग्य असल्याचे सांगत कर्णधारपद सोडणार नसल्याचे सांगितले होते. 

याबाबतीत आज पुन्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनीही स्मिथ कर्णधार म्हणून कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ” स्मिथ सध्या ऑस्ट्रलिया संघाचे नेतृत्व करत आहे. आम्ही जो प्रकार झाला त्याची चौकशी करत आहोत. जेव्हा आमच्यासमोर सर्व चित्र स्पष्ट होईल तेव्हा पुढील पुढील निर्णय घेऊ.”

काल ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट आणि स्मिथने पिवळ्या रंगाचा टेप चेंडूला लावून छेडछाड केल्याचे मान्य केले होते. तसेच  बॅनक्रोफ्ट पिवळ्या रंगाचा टेप त्याच्या पॅन्टमध्ये लपवत असताना टीव्ही कॅमेरामध्ये त्याची ही क्रिया कैद झाल्याने तो पकडला गेला होता. 

हा सर्व प्रकार धक्कादायक आणि अत्यंत निराश करणारा असल्याचेही सदरलँड यांनी म्हटले आहे. तसेच ते पुढे म्हणाले हा खूप वाईट दिवस होता. हे सर्व क्रीडाभावनेच्या विरुद्ध आहे. 

ते पुढे म्हणाले, ” बॅनक्रोफ्टला आयसीसीच्या आचारसंहितेनुसार शिक्षा होईल. ही शिक्षा आणि दंड जो होईल तो मान्य असेल. त्याने आणि स्मिथने यावर भाष्य केले आहे. दुर्दैवाने या प्रकरणाचा हा शेवट नाही. आम्ही यासगळ्याची जबाबदारी घेतली असून हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.”

 पुढे त्यांनी सांगितले की या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी ऑस्ट्रलियाचे अधिकारी दक्षिण आफ्रिकेला जातील. 

https://twitter.com/CricketAus/status/977664517747433473