स्मिथच्या वडिलांनी त्याची क्रिकेट बॅग टाकली गॅरेजमध्ये

चेंडू छेडछाड प्रकरण सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच गाजलं. या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १ वर्षाची तसेच कॅमेरॉन बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली आहे.

या बंदीनंतर पत्रकार परिषदेमध्ये स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही अश्रू अनावर झाले. या दोघांनीही माफी मागितली आहे.

स्मिथच्या पत्रकार परिषदेत त्याच्याबरोबर त्याचे वडील पीटर हे देखील त्याच्या सोबत होते. त्यावेळी स्मिथ म्हणाला होता की त्याच्यामुळे त्याचे पालक दुखी झाले. त्यामुळे त्याला वाईट वाटले.

या पत्रकार परिषदेनंतर पीटर यांनी सेव्हन न्यूजला सांगितले की स्मिथ आता ठीक आहे. तो यातून बाहेर येईल. सेव्हन न्युजने पीटर यांनी स्मिथची क्रिकेट बॅग कारमधून काढून गॅरेज मध्ये टाकतानाचा व्हिडीओ दाखवला होता. यात त्यांनी स्मिथ ठीक आहे असेही म्हटले आहे.

याचबरोबर आज वॉर्नरची पत्नी कॅन्डिसही सिडनी संडे टेलिग्राफला सांगताना म्हणाली, ” मला असं वाटतंय की यात सगळी माझीच चूक आहे आणि हेच मला जास्त त्रासदायक होत आहे.”

यावरून चेंडू छेडछाड प्रकरणामुळे दोषी ठरलेल्या खेळाडूंच्या कुटुंबालाही धक्का बसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही १ वर्ष आंतराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी बंदी आहे. यामुळे बीसीसीआयनेही या दोघांच्या आयपीएल खेळण्यावर यावर्षी बंदी घातली आहे.