ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर गुवाहाटीमध्ये दगडफेक?

 

गुवाहाटी ! ऑस्ट्रेलियन संघाने गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. जेव्हा या विजयानंतर संघ आपल्या हॉटेलकडे रवाना होत होता तेव्हा कुणीतरी संघाच्या बसवर दगड फेकल्याचे वृत्त आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचने बसच्या फुटलेल्या काचेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

फिंच ट्विटरवर म्हणतो, “भीती वाटण्यासारखे आहे की कुणीतरी संघाची बस हॉटेलकडे जात असताना दगड फेकला. “

एका वृत्तानुसार क्रिकेटच्या बॉल एवढ्या आकाराचा दगड कुणीतरी बसच्या उजव्या बाजूने फेकला. काच फुटल्यावर अनेक छोटे काचेचे तुकडे बसमध्ये पडले. यात कोणताही खेळाडू जखमी झाला नाही. ऑस्ट्रेलियन संघाला काहीसा असाच अनुभव बांगलादेश दौऱ्यातही आला होता.

गुवाहाटी शहरात तब्बल ७ वर्षांनी सामना होत असतानाही फॅन्सचे हे कृत्य नक्कीच शोभनीय नाही.

तत्पूर्वी भारतीय संघाचा या सामन्यात दारुण पराभव झाला. भारताच्या आघाडीच्या फळीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी डोके वर काढू दिले नाही.