Australian Open 2018: नदालचा चौथ्या फेरीत प्रवेश

स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालने आज ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने बोस्नियाच्या दामिर झुमहरला ६-१,६-३,६-१ अशा फरकाने सरळ सेट मध्ये पराभूत केले आहे.

अव्वल मानांकन असणाऱ्या नदालने १ तास ५० मिनिटे चाललेल्या या लढतीत झुमहरला जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही. पहिला सेट तर नादालने २२ मिनिटातच जिंकला होता.

दुसऱ्या सेट मध्ये झुमहरने २-० अशा पिछाडीनंतर थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण नदालने अनुभवाच्या जोरावर दुसरा सेटही जिंकूट सामन्यात आघाडी मिळवली.

तिसऱ्या सेटमध्येही नादालने वर्चस्व राखली होते पण झुमहरने त्याला सेटच्या अखेरीस मॅच पॉईंट मिळवण्यासाठी चांगले झुंजविले. अखेर नदालने या सेटमध्ये ६-१ ने विजय मिळवून सामनाही आपल्या नावावर केला.

दामिर झुमहर आणि नदाल या आधी मियामी ओपन २०१६ मध्ये आमने सामने आले होते.

नदालचा चौथ्या फेरीतील सामना २४ वे मानांकन असणाऱ्या अर्जेन्टिनाच्या डिएगो श्वार्टझमॅन विरुद्ध होणार आहे.