तर एस. श्रीशांत खेळू शकतो दुसऱ्या देशाकडून

भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने आजीवन घातलेल्या बंदीवर केरळ उच्च न्यायालयाने निर्णय देताना बंदीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आज एका खाजगी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत श्रीशांतने दुसऱ्या देशाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. 

या न्यूज चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये श्रीशांत म्हणाला, ” माझ्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे, आयसीसीने नाही. त्यामुळे मी दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो. माझे सध्या वय ३४ वर्ष आहे. माझ्यासमोर अजून ६ वर्षांची कारकीर्द आहे. “

“जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर तुम्हाला ते खेळायलाही आवडते. फक्त एवढेच नाही तर बीसीसीआय ही खाजगी संस्था आहे. केवळ आपण तिला भारतीय क्रिकेट संघ म्हणतो. त्यामुळे मी एखाद्या दुसऱ्या देशासाठी खेळलो तर ते असेच असेल. केरळ रणजी संघासाठी खेळणे ही वेगळी गोष्ट आहे. मला केरळकडून खेळायची इच्छा होती परंतु बीसीसीआयने मला तसे करू दिले नाही. ”