सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताच्या अंतिम फेरीच्या अाशा संपुष्टात

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत आयर्लंडने आज भारतावर ३-२ अशा फरकाने मात केली आहे. या पराभवामुळे भारताच्या अंतिम फेरीच्या अाशा संपुष्टात आल्या आहेत.

भारताने सामन्यात दोन वेळा आघाडी मिळवली होती, परंतु दोन्ही वेळेस आयर्लंडने पुनरागमन करत भारताची आघाडी मोडीत काढली. भारताकडून रमनदीप सिंगने पहिल्या सत्रात १० व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर दुसऱ्या सत्रात २४ व्या मिनिटाला शेन ओ’डोनोग्यूने आयर्लंडकडून गोल करत बरोबरी साधली.

ही बरोबरी जास्त काळ टिकून न देता भारताच्या अमित रोहिदासने २६ व्या मिनिटाला गोल करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. पण भारताला ही मिळालेली आघाडी टिकवून ठेवता आली नाही.

तिसऱ्या सत्रात आयर्लंडने पुन्हा पुनरागमन करून दोन गोल केले. ३६ व्या मिनिटाला सिन मरेने गोल केला आणि आयर्लंडने पुन्हा सामन्यात बरोबरी साधली. ४२ व्या मिनिटाला आयर्लंडने दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला. या पेनल्टी कॉर्नरवर ली कोलने गोल करून आयर्लंडला आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या चौथ्या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे आयर्लंडने हा सामना ३-२ ने सहज जिंकला.

या स्पर्धेत अंतिम सामन्यात जाण्यासाठी भारताला आज विजय मिळवणे आवश्यक होते. कारण याआधी भारताने या स्पर्धेत एकच विजय मिळवला आहे. हा विजय त्यांनी यजमान मलेशिया विरुद्ध मिळवला. तर इंग्लंड विरुद्ध बरोबरी साधली होती. तसेच अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारला होता.