सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताने मिळवला पहिला विजय

सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत आज भारतीय संघाने यजमान मलेशियावर ५-१ ने मात करत या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. या विजयामुळे भारताच्या अंतिम फेरीच्या अशा कायम राहिल्या आहेत.

आज भारताकडून पहिल्याच सत्रात शिलानंद लाक्राने पहिला गोल करत आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रात मलेशियाच्या फैजल सारीने ३३ व्या मिनिटाला गोल करून मलेशियाला बरोबरी साधून दिली. पण भारतानेही ही बरोबरी जास्त काळ टिकवून दिली नाही.

भारताकडून तिसरे सत्र संपण्यासाठी ३ मिनिटे बाकी असताना गुरजंत सिंगने गोल करत पुन्हा भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र भारताने मलेशियावर पूर्णपणे वर्चस्व ठेवले. चौथ्या सत्रात भारताकडून तीन गोल करण्यात आले.

यामध्ये सुमीत कुमार(४८ वे मिनिट) रमनदीप सिंग(५१ वे मिनिट) आणि गुरजंतने(५७ वे मिनिट) पुन्हा एकदा गोल केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या विजयामुळे भारताच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा जरी पल्लवित झाल्या असल्या तरी त्यांना शुक्रवारी होणाऱ्या शेवटच्या साखळी फेरीतील निर्णयांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

भारताला जर अंतिम सामन्यात प्रवेश मिळवायचा असेल तर शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. तसेच ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना विरुद्ध विजय मिळवेल आणि इंग्लड विरुद्ध मलेशिया सामना बरोबरीत सुटावा अशी आशा करावी लागेल.

भारत गुणतालिकेमध्ये सध्या पाचव्या स्थानी आहे. भारताने याआधी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना विरुद्ध पराभव स्वीकारला आहे. तर इंग्लंड विरुद्ध बरोबरी साधली आहे.