सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताने आयर्लंड विरुद्ध पराभवाचा वचपा काढत मिळवले ५वे स्थान

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत भारताने आयर्लंडला पराभूत करत पाचवे स्थान मिळवले आहे. आज भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये ५ व्या स्थानासाठी सामना रंगला होता. या सामन्यात भारताने आयर्लंडवर ४-१ ने मात केली.

आज भारताने आयर्लंडवर पूर्णपणे वर्चस्व राखले होते. भारताच्या वरूण कुमारने पहिल्या सत्राच्या सुरवातीलाच ५ व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर तिसऱ्या सत्रात ३२ व्या मिनिटाला त्याने त्याचा या सामन्यातील दुसरा गोल करत भारताची आघाडी ३-० ने वाढवली.

त्याआधी सामन्यातील दुसऱ्या सत्रात शिलानंद लाक्राने २८ व्या मिनिटाला भारताकडून दुसरा गोल केला होता. भारतीय संघाने या लढतीतील तीनही सत्रात चांगला खेळ करून आयर्लंडला पिछाडीवर ठेवण्यात यश मिळवले होते. भारताकडून चौथा गोल ३७ व्या मिनिटाला गुरजंत सिंगने करून भारताची आघाडी ४-० अशी भक्कम केली.

अखेर आयर्लंडकडून चौथ्या सत्रात जुलिअन डेलने गोल करून आयर्लंडचा या सामन्यातील व्हाईटवॉश टाळला. पण त्याने जेव्हा गोल केला तेव्हा खूप उशीर झाला होता.

भारत आणि आयर्लंड संघात कालच साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला होता. या सामन्यात आयर्लंडने भारताला ३-२ने पराभूत केले होते. या पराभवामुळे भारताच्या पदकाच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या.

भारतासाठी या स्पर्धेतील कामगिरीही खराब राहिली आहे. त्यांनी या स्पर्धेत आज दुसराच विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी यजमान मलेशिया विरुद्ध पहिला विजय मिळवला होता. तर इंग्लंडविरुद्ध बरोबरी साधली होती आणि ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना विरुद्ध पराभव स्वीकारला होता.