सुनिल छेत्री होणार भारताकडून 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा दुसरा फुटबॉलपटू

मुंबई।  भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनिल छेत्री आज 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. सध्या भारतीय फुटबॉल संघ चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 या स्पर्धेत खेळत आहे. आजचा हा सामना केनिया विरूध्द होणार आहे.

या 33 वर्षीय खेळाडूने त्याच्या 99व्या सामन्यात हॅटट्रिक केली होती. चीनी ताइपे विरूध्दचा हा सामना भारताने 5-0 ने जिंकला. छेत्रीने सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये 99  सामन्यात 59 गोल केले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाकरता सर्वाधिक गोल करण्याऱ्यामध्ये रोनाल्डो (81 गोल) आणि मेस्सी (64 गोल) नंतर छेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. 100 सामने खेळणाऱ्यांमध्ये तो बायचुंग भुतिया (104सामने) नंतर दुसरा भारतीय खेळाडू आहे.

छेत्रीने आंतरराष्ट्रीय पदार्पण पाकिस्तान मधील क्वेटाच्या सामन्यात केले होते. 2005 ला झालेला हा मैत्रीपूर्व सामना शेजारील दोन देशांमध्ये झाला. यावेळी सुखविंदर सिंग हे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक होते.

या सामन्यात छेत्रीने एक गोल केला होता. हा सामना 1-1 असा अनिर्णित राहिला. तसेच 2007च्या नेहरू कप स्पर्धेत त्याने कबोंडिया विरूध्दच्या सामन्यात पहिल्यांदा हॅटट्रिक केली. 2007, 2009 आणि 2012 या तीन वर्षांच्या जिंकलेल्या नेहरू कप स्पर्धेत तो भारतीय संघात होता.

2012च्या एएफसी चॅलेंज कप क्वालिफीकेशन या स्पर्धेत त्याने पहिल्यांदा भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले.

भारताचे फुटबॉल रॅकिंग वाढवण्यासाठी छेत्री स्टिफन कॉन्स्टंटीन यांच्या मार्गदर्शनाखाली 2019च्या एएफसी आशिया कप क्वालिफीकेशन या स्पर्धेत खेळला. या स्पर्धेत त्याने चार गोल केले.

भुतियाच्या निवृत्ती नंतर छेत्री भारताचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. सुरू असलेल्या  इंटरकॉन्टिनेंटल या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने चीनी ताइपेला 5-0 ने पराभूत केले.

या सामन्यात प्रेक्षकांची संख्या कमी होती. यामुळेच त्याने चाहत्यांना ट्विटरवर भारताचे फुटबॉल सामने बघण्यासाठी भावनिक आवाहन केले.

त्याच्या या व्हिडिअोला विराट कोहली, सुरेश रैना आणि सचिन तेंडूलकर यांनी समर्थन दिले.