आजच्याच दिवशी ३४ वर्षांपूर्वी गावसकरांनी मोडला होता ब्रॅडमन यांचा हा विक्रम

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी २८ डिसेंबर १९८३ साली डॉन ब्रॅडमन यांचा कसोटीतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला होता. त्यांनी चेन्नई कसोटीत विंडीजविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती.

ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यात २९ शतके केली होती. चेन्नई कसोटी हा भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील मालिकेतील ६वा कसोटी सामना होता.२४ ते २९ डिसेंबर या काळात हा कसोटी सामना झाला होता आणि त्यातील चौथ्या दिवशी त्यांनी हा कारनामा केला होता.

या सामन्यात त्यांनी ४२५ चेंडूत नाबाद २३६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताकडून अन्य खेळाडूंमध्ये रवी शास्त्री यांनी ७२ तर सईद किरमाणी यांनी ६३ धावा केल्या होत्या.

गावसकरांचे हे कसोटीतील ३०वे शतक होते. गावसकर जेव्हा निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर ३४ कसोटी शतके होती. यानंतर अनेक वर्षांनी हा विक्रमही मोडला गेला परंतु आजही तो विक्रम गावसकर यांच्याच देशातील आणि शहरातील खेळाडूच्या अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने कसोटीत एकूण ५१ शतके केली आहेत.

सध्या गावसकर यांच्या ३४ शतकांपेक्षा जास्त शतके करणारे कसोटीत ५ खेळाडू असून त्यात सचिन तेंडुलकर(५१), जॅक कॅलिस(४५), रिकी पॉन्टिंग(४१), कुमार संगकारा(३८) आणि राहुल द्रविड(३६) हे खेळाडू आहेत.