आशिष नेहराला न्यूजीलँडविरुद्ध संधी का दिली?: सुनील गावसकर

भारताच्या माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या आशिष नेहराला संधी देण्याच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उभे केले आहे.

याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय नेहराने घेतला आहे. त्याने बीसीसीआयकडे त्याचा शेवटचा सामना त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच फिरोजशहा कोटला मैदानावर खेळण्यात यावा अशी विनंती केली आहे. गावसकरांच्या मते भारतीय संघात निवड ही फक्त कामगिरीवरून झाली पाहिजे आणि भावनिक दृष्टिकोनातून नाही.

“आशिष नेहराने निवृत्ती घोषित केल्यामुळे काही समस्याही निर्माण होत आहेत, कारण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला अंतिम संघात स्थान देण्यात आले नव्हते. मग न्यूझीलँड विरुद्धच्या पहिल्या टी२० साठी त्याला संघात कसे घेता येईल. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार दोघेही अफलातून फॉर्ममध्ये आहेत मग त्यांना संघातून बाहेर काढणे योग्य आहे का ?” असे गावस्कर म्हणाले.