म्हणून सुनील गावसकरांनी केला आपल्या कंपनीचा तो विभाग बंद !

सुनील गावसकर यांनी खेळाडूंचे मॅनेजमेंट करणाऱ्या आपल्या प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप कंपनीमधील विभाग बंद केला आहे. ही कंपनी पाच खेळाडूंचे मॅनेजमेंट पाहत होती.

यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांना आपली समालोचनची आवड जोपासायची आहे. जे चार क्रिकेटपटूचे या कंपनीकडून मॅनेजमेंट पहिले जायचे त्यात शिखर धवन, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, सर्फराज खान आणि सरदारा सिंग यांचा समावेश होता.

बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे यापुढे कोणताही करार करताना यापुढे एकाच व्यक्तीची उत्पन्नाची दोन किंवा त्यापेक्षा अधिक साधने ही भारतीय क्रिकेट बोर्डातून येणारी नसावी.

“आम्ही खेळाडूंना आमचा निर्णय कळवला आहे. आम्ही यापुढे त्यांचे कोणतेही मॅनेजमेंट पाहणार नाही. तुम्ही खेळाडूंच्या बाजूने याची खात्री करून घेऊ शकता. ” असे कंपनीच्या सूत्रांकडून कळवण्यात आले आहे.

या निर्णयामुळे बीसीसीआय किती समाधानी आहे हे माहित नाही परंतु येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत गावसकर समालोचन करताना दिसतील.

गावसकरांच्या या कंपनीची चर्चा त्यावेळी झाली जेव्हा सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयवर नियुक्त केलेल्या समितीतील रामचंद्र गुहा यांनी राहुल द्रविड, सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गजांवर बीसीसीआयमधून येणाऱ्या दुहेरी उत्पन्नावर निशाणा साधत राजीनामा दिला होता.