चहलच्या नो बॉलवर गावस्करांनी सुनावले खडे बोल

दक्षिण आफ्रिकेने भारतविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला.या सामन्यात भारताचा फिरकीपटू गोलंदाज युझवेन्द्र चहलने डेव्हिड मिलरला त्रिफळाचित तर केले, पण तो नो बॉल होता. त्यामुळे भारताचे महान फलंदाज सुनील गावस्करांनी खडे बोल सुनावले आहेत.

चहलने ५.३ षटकात दोनदा नो बॉल टाकले. त्यातील एका चेंडूवर त्याने मिलर ७ धावांवर असताना त्रिफळाचित झाला, पण हा चेंडू नो बॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले. या जीवदानाला फायदा घेत मिलरने नंतर २८ चेंडूमध्ये ३९ धावा केल्या.

याबद्दल गावस्कर सामन्यानंतर म्हणाले, ” माझ्यासाठी डेव्हिड मिलरला टाकलेला तो नो बॉल आणि त्यानंतर त्याने त्या जीवदानाला घेतलेला फायदा हा सामन्यातील टर्निंग पॉईंट होता. तोपर्यंत सामना भारताच्या नियंत्रणाखाली होता. त्यांनी चांगल्या खेळत असलेल्या डिव्हिलियर्सलाही लवकर बाद केले होते. जेव्हा मिलरला चहलचे चेंडू समजायला अवघड जात होते, तेव्हा भारतीय संघ ड्राइवर सीटवर होता.”

“मला वाटते यात व्यावसायिकतेचा अभाव दिसून येतो. कदाचित भारताने मालिकेत घेतलेल्या ३-० अशा आघाडीनंतर आलेल्या निवांतपणामुळे झाले असेल. याचा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पूर्ण फायदा घेतला. त्यांनी चांगली फलंदाजी केली. मिलर, क्लासेन उत्कृष्ट खेळले. तसेच फेहलूकवयोने येऊन स्फोटक खेळत सामना जिंकून दिला”

याबरोबरच गावस्करांनी मॉर्डन क्रिकेटमध्ये टेकनॉलॉजीचा वापर होत असल्याने कोणीही नो बॉल टाकायला नको, असेही सांगितले. याबद्दल ते म्हणाले, “मॉर्डन क्रिकेटमध्ये सर्व प्रकारच्या टेकनॉलॉजी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही नोबॉल टाकायला नको. कोणी डाउन द लेग साईडला टाकलेला वाईड बॉल समजू शकतो कारण त्यासाठी कठोर नियम आहेत”

गावस्कर पुढे म्हणाले, “वेगवान गोलंदाजांकडून काहीवेळेस नोबॉल होऊ शकतो. पण तरीही ५० षटकांचा सामना असल्याने नोबॉल नंतर फ्री हिट दिला जातो. त्यामुळे मला असे वाटते की वेगवान गोलंदाजांनीही नोबॉल टाकला नाही पाहिजे. ते रनर-अपचे माप घेण्यासाठी अनेक टेप्सचा वापर करतात. मग तरीही नो बॉल कसा होतो. “

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील ६ सामन्यांच्या मालकेत भारत ३-१ ने आघाडीवर आहे. आता उद्या पाचवा सामना पोर्ट एलिझाबेथ येथे खेळवण्यात येणार आहे.