चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुपर ओव्हर

क्रिकेटचे रूप दिवेसंदिवस बदलत असून फेब्रुवारी महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर हा प्रकार सामील करण्यात आला आहे. याची सुरुवात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सेमीफायनल पासून होणार आहे.
जर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सेमीफायनल किंवा फायनलचा सामना टाय झाला तर टी२० क्रिकेटप्रमाणे तो सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल. आजपर्यंत हा प्रकार आयपीएल किंवा लीग क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर इंग्लंडमध्ये लगेचच होणाऱ्या महिला विश्वचषकात सुद्धा सेमीफायनल आणि फायनल जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल.

हा प्रकार खऱ्या अर्थाने भारत-पाकिस्तान यांच्यातील २००७ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकातील सामान्यांपासून प्रसिद्ध झाला होता. आजही सुपर ओव्हर म्हटलं की त्या सामन्याची आठवण क्रिकेट चाहते काढतात.

१९९९ च्या ५० ओव्हरच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टाय झाला होता. परंतु त्या वेळी सुपर ओव्हर किंवा बॉल आऊट असे प्रकार क्रिकेटमध्ये अस्तित्वात नसल्याकारणाने साखळी फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला पुढे संधी दिली जात असे. त्याच आधारावर ऑस्ट्रेलियाला पुढे संधी मिळाली आणि त्यांनी तो विश्वचषक जिंकला सुद्धा.