ISL 2018: सुपर-सब बिकाशच्या गोलमुळे जमशेदपूरचा मुंबईवर विजय

मुंबई । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीने गुरुवारी मुंबई सिटी एफसीवर 2-1 असा विजय मिळविला. बदली खेळाडू बिकाश जैरू याने सहा मिनिटे बाकी असताना केलेला गोल निर्णायक ठरला. संजू प्रधानच्या स्वयंगोलमुळे पिछाडीवर पडलेल्या मुंबईला एव्हर्टन सँटोसने 11 मिनिटे बाकी असतान बरोबरी साधून दिली होती, पण अखेरीस मुंबई फुटबॉल एरीनावर यजमान संघाला हताश व्हावे लागले.

जमशेदपूरने 14 सामन्यांत सहावा विजय मिळविला. चार बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. जमशेदपूरचे 22 गुण झाले. एफसी गोवा संघाला मागे टाकून त्यांनी चौथा क्रमांक मिळविला. गोव्याचे 19 गुण असले तरी त्यांच्या 11 सामन्यांच्या तुलनेत जमशेदपूरचे तीन सामने जास्त आहेत. मुंबईला 13 सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. पाच विजय व दोन बरोबरींसह 13 सामन्यांतून 17 गुण मिळवित त्यांचा सहावा क्रमांक कायम राहिला.

पुर्वार्धात दोन्ही संघ सुरवातीला फारसा लक्षवेधी खेळ करू शकले नाहीत. त्यामुळे गोलशून्य बरोबरीची चिन्हे निर्माण झाली होती. ही कोंडी मुंबईच्या दुर्दैवाने आणि जमशेदपूरच्या सुदैवाने अगदी विचीत्र परिस्थितीत सुटली. 37व्या मिनिटाला जमशेदपूरच्या फारुख चौधरीने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित घोडदौड सुरु केली. त्याने नेटच्या दिशेने मारलेल्या फटक्यात ताकदीच अभाव होता. हा चेंडू मुंबई सिटीच्या मार्सियो रोझारीयो याच्या टाचेला लागला आणि नेटच्या दिशेने जाऊ लागला. मुंबईच्याच संजू प्रधानने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा स्पर्श झालेला चेंडू नेटच्या वरच्या भागातून आत गेला आणि स्वयंगोल झाला.

11 मिनिटे बाकी असताना मुंबईला डावीकडे कॉर्नर मिळाला. त्यावर थियागो सँटोसने नेटच्या अलिकडच्या बाजूला फटका मारला. त्यावर आक्रमक पवित्रा घेत एव्हर्टनने फटका मारला. जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल पुढे सरसावला. त्याने थोपविलेला चेंडू एव्हर्टनला पुन्हा लागून नेटमध्ये गेला.

सहा मिनिटे बाकी असताना जमशेदपूरच्या आंद्रे बिके याने उजवीकडून मुसंडी मारली. त्याने मध्य भागात असलेला बदली खेळाडू केर्वेन्स बेल्फोर्टला पास दिला. बेल्फोर्टने मारलेला फटका मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने थोपविला, पण बिकाशने रिबाऊंडवर अप्रतिम फिनीशिंग करीत गोल नोंदविला. जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी 81व्या मिनिटाला फारुख चौधरी याच्या ऐवजी बिकाशला मैदानावर उतरविले होते. याच बिकाशने तीन मिनिटांत सनसनाटी गोल केला.

पुर्वार्धात सुरवातीला नीरस खेळ झाला. दुसऱ्याच मिनिटाला मुंबईला फ्री-किक मिळाली. एव्हर्टन सँटोसने उजवीकडून आगेकूच केली, पण त्याला टिरीने पाडले. अचीले एमाना याने ही फ्री-किक घेताना वेगवान फटका मारला, पण टिरीनेच हेडींगकरवी चेंडू जमशेदपूरच्या क्षेत्रापासून दूर घालविला.

आठव्या मिनिटाला जमशेदपूरला चांगली संधी मिळाली होती. इझु अझुकाने मध्य क्षेत्रातून आगेकूच केली. त्याने फारुखला पास दिला. फारुखने डावीकडून घोडदौड करीत त्याच्या मार्करला हुलकावणी देत जोरदार फटका मारला, पण मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने पुढे सरसावत चपळाईने बचाव केला.

चार मिनिटांनी फारुखने अशीच मुसंडी मारत अझुकाला पास दिला. अझुकाने डाव्या पायाने मारलेला फटका थोडक्यात बाहेर गेला. 18व्या मिनिटाला थियागो सँटोसने बलवंत सिंगला पास देण्याचा प्रयत्न केला, पण जमशेदपूरच्या बचाव फळीने आपले क्षेत्र सुरक्षित राखले. 32व्या मिनिटाला रोझारीयोने 30 यार्डवरून फ्री-किकवर मारलेला चेंडू स्वैर होता.

दुसऱ्या सत्रात बलवंतने चेंडूवर ताबा मिळवित उजवीकडून आगेकूच केली. त्याने थियागोला पास दिला. थियागोने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण तो जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या बाजूने बाहेर गेला.

58व्या मिनिटाला संजूने उजवीकडून मुसंडी मारत बलवंतच्या दिशेने चेंडू मारला. बलवंतने जोरदार हेडींग केले, पण सुब्रतने भक्कम बचाव केला. 61व्या मिनिटाला बलवंतने सुवर्णसंधी दवडली. एव्हर्टन सँटोसने उजवीकडून क्रॉस पास दिल्यानंतर बलवंतने नेट मोकळे असूनही स्वैर हेडींग केले. 66व्या मिनिटाला एमाना याने संजूला बॉक्समध्ये पास दिला. संजूने मैदानालगत जोरदार फटका मारला, पण सु्ब्रतने उजवीकडे झेप टाकत चेंडू थोपविला. बलवंतने रिबाऊंडवर प्रयत्न केला, पण सुब्रतने चपळाईने सावरत अचूक अंदाज घेत चेंडू सहज अडविला.

निकाल :
मुंबई सिटी एफसी : 1 (एव्हर्टन सँटोस 79)
पराभूत विरुद्ध जमशेदपूर एफसी : 2
(संजू प्रधान 37-स्वयंगोल, बिकाश जैरू 84)