सुप्रीमो चषकात विनर स्पोर्टस् मराठा पंजाब उपांत्य फेरीत

मुंबई । सुप्रीमो चषक आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया दिवशी विनर स्पोर्टस् मराठा पंजाब संघाने दोन धडाकेबाज विजयांसह उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. अख्तर शेखच्या 16 चेंडूंतील 26 धावांच्या घणाघाताच्या बळावर विनर स्पोर्टस् मराठा पंजाबने 62 धावांपर्यंत मजल मारली आणि टायगर 55 सांताकुझ संघाला झिशान भन्नाट माऱयाने 52 धावांवर रोखत 10 धावांनी विजय नोंदवला.

क्रीडाप्रेमी आणि शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया दिवशीही क्रिकेटप्रेमींना थरारक लढतींचा अनुभव आणि चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळाली.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विनर स्पोर्टस् मराठा पंजाबने अख्तर शेख (26) आणि सुमीत ढेकळेने 6 चेंडूंत 2 षटकार खेचत केलेल्या 17 धावांमुळे 8 षटकांत 6 बाद 62 धावा केल्या.

हे आव्हान टायगर 55 सांताकुझ संघाला झेपलेच नाही. त्यांच्याकडून मंदार गरूडेच केवळ दोन अंकी धावसंख्या गाठू शकला नाही. झिशानने 2 षटकांत अवघ्या 6 धावा देत 3 फलंदाजांना टिपत टायगर 55 सांताकुझला 8 बाद 52 धावांवर रोखले आणि 10 धावांनी विजयासह उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.

त्याअगोदर विनर स्पोर्टस् मराठा पंजाबने एस ए ब्रह्मा बॉईज बडोदा संघाचा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. विनर्स स्पोर्टस्ने अख्तर शेखच्या 2 षटकार आणि 2 चौकारांसह 19 चेंडूंत टोलवलेल्या 35 धावांच्या जोरावर 7 बाद 79 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.

विनर्सच्या गोलंदाजांनी या धावांचा पाठलाग एस ए ब्रह्मा बॉईज बडोदा संघाचा डाव 39 धावांतच गुंडाळला. विनर स्पोर्टस्च्या अंबुटीने स्वप्नवत गोलंदाजी करताना 6 धावांत 6 फलंदाज टिपले नाही तर एक हॅटट्रीकही नोंदवली.

याचबरोबर अंबुटीने सुप्रीमो चषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम कायम केला. एकाच डावांत 6 गडी बाद करणारा अंबुटी दुसराच गोलंदाज ठरला.

तसेच दुसऱया एका सामन्यात टायगर 55 सांताकुझ संघांने संस्कृती इलेव्हन नवी मुंबईने उभारलेले 6 बाद 62 धावांचे लक्ष्य 8 चेंडूंआधीच गाठले.

सचिन काटकरच्या नाबाद 31 आणि त्याने तिसऱया विकेटसाठी अरविंद राणा(14) बरोबर रचलेल्या 36 धावांच्या अभेद्य भागीमुळे टायगर 55 ने फक्त 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच विजयी आकडा ओंलाडला.

संक्षिप्त धावफलक

विनर स्पोर्टस् मराठा पंजाब – 8 षटकांत 7 बाद 79 ( अख्तर शेख 35, सुमीत ढेकळे 18, प्रदीप बडे आणि भरत लोहार प्रत्येकी 2 विकेट) विजयी वि. एस ए ब्रह्मा बॉईज बडोदा- 6.5 षटकांत सर्वबाद 39 ( अंबुटी 6 धावांत 6 बळी)

संस्कृती इलेव्हन – 6.4 षटकांत 2 बाद 62 ( किरण पवार 29) पराभूत वि. टायगर 55 सांताकुझ- 6.4 षटकांत 2 बाद 63 (सचिन काटकर ना. 31, अरविंद राणा ना. 14)

उपांत्यपूर्व फेरी – विनर स्पोर्टस् मराठा पंजाब- 8 षटकांत 6 बाद 62 ( अख्तर शेख 26, सुमीत ढेकळे 17, निखील बरोड 19 धावांत 3 बळी) विजयी वि. टायगर 55 सांताकुझ- 8 षटकांत 8 बाद 52 ( मंदार गरूडे 14, झिशान 6 धावांत 3 बळी)