सुप्रीमो चषक फुटबॉल स्पर्धेत कालिना-रायगड आणि ठाणे-विजयदुर्ग अशी अंतिम लढत

मुंबई । कालिना-रायगड आणि ठाणे विजयदुर्ग या संघांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये अनुक्रमे बोरिवली-विशालगडचा 4-2 आणि नवी मुंबई पन्हाळगडचा 3-1 असा पराभव करून सुप्रीमो चषक विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

ही स्पर्धा आमदार संजय पोतनीस आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने खेळविली जात आहे. कालिनामधील एअर इंडिया कॉलनीच्या मैदानावर विद्युत प्रकाशझोतात विद्युतप्रकाशझोतांत चारही संघांना निर्धारित वेळेत केवळ दोनच गोल करता आले.

कालिना आणि बोरिवली ही लढत 1-1 अशी तर ठाणे आणि नवी मुंबई ही लढत गोलशून्य अवस्थेत संपली.

कालिना संघाने खेळाला धडाकेबाज खेळ करताना दुसऱयाच मिनीटाला जबरदस्त गोल चढविला.

जॉन कुटिन्होच्या हवेत वळलेल्या फ्री किकचा अचूक अंदाज घेत पुढे सरसावणाऱया प्रमोद पांडेने एका अचूक हेडरच्या मदतीने चेंडू गोलमध्ये टोलविला. पण बोरिवलीने केवळ चारच मिनीटांत प्रत्युत्तर दिले.

प्रतिस्पर्ध्यांच्या बचाव फळीचा पुरेपूर लाभ उठवत (एरन) डिकॉस्टाने पुढे सरसावत येणाऱया कालिना गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गोलमध्ये पाठवला. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रयत्न करूनही कोंडी फुटू शकली नाही.

पेनल्टी शूटआऊटमध्ये कालीनाचे ऍलन डायस, प्रमोद पांडे आणि जॉन कुटिन्हो यांनी अचूक निशाणा साधला. कालिनाचा गोलरक्षक विक्रम सिंगने प्रतिस्पर्ध्यांच्या दोन पेनल्टी किक रोखल्या.

त्याच्या शानदार बचावामुळेच कालिनाला आगेकूच करता आली. टायब्रेकमध्ये हीरो ठरलेला विक्रमच सामनावीर ठरला. बोरिवलीकडून तुषार पुजारीने आणि एरन डिकॉस्टा यांनी गोल केले.

ठाणे-नवी मुंबई यांच्यातील शूटआऊटमध्ये ठाण्याकडून श्रीकांत व्हरमाल्लू, निशांत राणा आणि रविश डिसूझा तर नवी मुंबईकडून आशिष लालगेन गोल केला. ठाणे संघाचा सिद्धात लवंदे सामनावीर ठरला.