सुप्रीमो चषक स्पर्धेत उत्तर प्रदेशचा गावदेवी चांदीप संघ 21 धावांनी विजयी

मुंबई । टेनिस क्रिकेटची आयपीएल म्हणून विख्यात असलेल्या सुप्रीमो चषक आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनीय लढतीत बबलू पाटीलच्या (44) झंझावाती खेळीमुळे उत्तर प्रदेशच्या गावदेवी चांदीप संघाला इंटर ग्लोब मरीन बडोदा संघाचा 21 धावांनी पराभव केला.

बबलूने केवळ 33 चेंडूंत चार चौकार आणि तितक्याच षटकारांनिशी सजवलेल्या या खेळीमुळे गांवदेवी चांदीपला 8 षटकांमध्ये 7 बाद 82 धावा करता आल्या.

बडोदा संघाला प्रत्युत्तरादाखल केवळ 7 बाद 61 एवढाच पल्ला गाठता आला. नवीन कश्यपने प्रभावी मारा करताना 9 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेत गांवदेवी चांदीपचा मार्ग सुकर केला.

ही स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कालिनाच्या एअर इंडियाच्या मैदानात विद्युत प्रकाशझोतात खेळविली जात असून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

तप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, कसोटीपटू लालचंद राजपूत, मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे, रणजीपटू मुसाविर खोटे आणि सिनेतारका आदिती सारंगधर यांचीही उपस्थिती लाभली.

उपउपांत्य फेरीच्या सामन्या आधी पहिल्या फेरीच्या दोन लढती रंगल्या. त्यात इंटर ग्लोब आणि गांवदेवी चांदीप या संघांनी विजय मिळवून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची संधी प्राप्त केली.

संक्षिप्त धावफलक :

उमर इलेव्हन ट्रायडंट (नवी मुंबई)- 8 षटकांत 7 बाद 65 (मुन्ना शेख 22, बिलाल शेख14, जलाल पटेल 7 धावांत 3 बळी) पराभूत वि. इंटर ग्लोब मरीन बडोदा- 8 षटकांत 8 बाद 65 (दिनेश नाकराणी 16, योगेश सोलंकी 12, विशाल सिंग 13 धावांत 3 बळी) सुपर ओव्हरमधे बडोदा संघ विजयी, सामनावीर : मुन्ना शेख

गावदेवी चांदीप(उत्तर प्रदेश) 8 षटकांत 7 बाद 91 (सचिन बर्गे 24, अफसर मिर्झा 20, आमीर रशीद 21, सुहास पवार 18 धावांत 3 बळी, सुलतान खान 28 धावांत 3 बळी) विजयी वि. अमन इलेव्हन बदलापूर- 8 षटकांत 6 बाद 81 (दिनेश कांबळे 30, अजित मोहिते 17, सुहास पवार 15) सामनावीर : सुहास पवार

उपउपांत्य फेरी : गावदेवी चांदीप (उत्तर प्रदेश) – 8 षटकांत 7 बाद 82 ( बबलू पाटील 44, जलाल पटेल 7 धावांत 2 बळी) विजयी वि. इंटर ग्लोब मरीन बडोदा 8 षटकांत 7 बाद 61 ( जलाल पटेल 16, नवीन कश्यप 9 धावंत 3 बळी) सामनावीर : जलाल पटेल